वंशाला दिवा हवा, डांबून रात्रभर बायकोला मार मार मारलं, सकाळी तिने प्राण सोडले!

55

वंशाला दिवा हवा, डांबून रात्रभर बायकोला मार मार मारलं, सकाळी तिने प्राण सोडले!

 The family wanted a lamp, he beat his wife all night long, she died in the morning!
बीड:- मुलाच्या हव्यासापोटी पतीने डांबून रात्रभर बेदम मारहाण केल्याने अतिरक्तस्त्राव होवून पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील औरंगपूर शिवारात घडली आहे. या घटनेनं संताप व्यक्त होत असून मुलाचा हव्यास करणार्‍या नराधम नवर्‍याविरोधात बीड ग्रामीण पोलिसात कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. नराधम आरोपीला पोलिसांनी अटक केली असून आरोपीला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं आहे.

10 वर्षांपूर्वी पैठण येथील राधा हिचा विवाह गेवराई तालुक्यातील इरगाव येथील महादेव आसाराम रेड्डे याच्यासोबत झाला होता. त्यानंतर त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असे दोन अपत्य झाले. मात्र दुर्दैवाने आठ वर्षाच्या मुलाचा आजाराने दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर वंशाला दिवा नाही म्हणून आता दुसरी बायको करावी लागेल, असा तगादा महादेव आपली पत्नी राधा हिच्याकडे लावत होता.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याने राधालाही मुलबाळ होणार नव्हतं, हे तिला माहीत असल्याने ती नवर्‍याला म्हणायची आपण शस्त्रक्रिया पलटून घेऊ. परवाच्या दिवशी त्याचे ऑपरेशन करण्यासाठी ते दोघे बीडच्या एका खासगी दवाखान्यात आले होते. डॉक्टरांनी तिला तपासून 30 हजार रूपयाचा खर्च सांगितला होता. 30 हजार रूपयांचा खर्च सांगताच महादेवचा पारा चढला अन् तिथेच त्याने बायकोला शिवीगाळ करत ऑपरेशन करूनही तुला लेकरू झालं नाही तर मी काय करू? पैसेही जातील म्हणून आता मी दुसरं लग्न करतो असे म्हणून तिच्यावर ओरडू लागला. घरी आल्यानंतरही राधाला त्याने बेदम मारहाण केली. हा प्रकार तिने तिच्या माहेरी सांगितला.

दोन-चार दिवसात आम्ही पैसे देतो असे म्हणून तिची समजूत काढली व तुझ्या सासरी येवून जावयालाही समजून सांगू असं माहेरून सांगण्यात आलं. रात्री मुलाच्या हव्यासापोटी आरोपी महादेव आसाराम रेड्डे याने त्याची पत्नी राधा हिचे हातपाय बांधून रात्रीपासून पहाटे तीन वाजेपर्यंत लाकडी दांड्याने मारहाण केली आणि पहाटेच घरातून निघून गेला. सकाळी 9 वाजता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राधाने शेजारच्या महिलेला हाक मारून मला सोडा आणि दवाखान्यात घेवून जा अशी विनंती केली. त्यानंतर शेजारच्या महिलेने ते राहत असलेल्या शेत मालकाला फोन केला, शेत मालक तेथे आल्यानंतर तिला जवळच्या निपाणी जवळका येथील दवाखान्यात घेवून जात असतानाच तिने वाटेतच प्राण सोडले.

या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी महादेव रेड्डे याच्या विरोधात मयत राधाचा भाऊ सुनिल राधाकिसन बांगडे रा.चित्तेगाव ता.पैठण यांच्या फिर्यादीवरून 302 चा गुन्हा दाखल झाला आहे. रात्रीच आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांनी दिली आहे.