शरीराचे दोन तुकडे झाले तरी तो होता जिवंत…

51

धुळे :नंदुरबार रेल्वेस्थानकावर मालगाडीखाली येऊन एका इसमाने आत्महत्या केली. त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले. पण त्यानंतरही काही सेकंद तो जिवंत होता. पोलिसांनी त्याच्याजवळ धाव घेतली, त्याचे पालथे शरीर उचलले. त्याने स्वत:चे नाव, पत्ता सांगितला आणि नंतर प्राण सोडला.
सोमवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास नंदुरबार रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. १ आणि २ च्या मध्ये ही घटना घडली. संजय मराठे (३९) असे या इसमाचे नाव असून तो रिक्षाचालक होता. मालगाडीचा वेग कमी होता. मालगाडी येताच संजयने स्वत:ला गाडीसमोर झोकून दिले. कमरेपासून त्याचे धड वेगळे झाले. मालगाडी जाताच रेल्वे स्थानकावर असलेले एस. एस. आय. गोविंद काळे व पोलिस कॉन्स्टेबल पुरूषोत्तम खिरटकर या पोलिसांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांच्या एका मदतनीसाने त्याला उचलले. त्यानंतर त्याने स्वत:चे नाव संजय नामदेव मराठे आहे, असे सांगितले आणि प्राण सोडला. ओळख पटल्याने त्याच्या नातेवाईकांना कळविण्यात आले. त्याने आत्महत्या का केली, याचे कारण समजू शकले नाही. लहान माळीवाडयात तो राहात होता. त्याच्या आत्महत्येच्या घटनेनंतर रिक्षाचालकांत हळहळ व्यक्त होत असून लहान माळीवाडा परिसरात शोककळा पसरली आहे.