टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करणार – राज्यमंत्री आदिती तटकरे

48

टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील रस्त्याचे काम वेगाने पूर्ण करणार
– राज्यमंत्री आदिती तटकरे


 
            मुंबई, दि. 5 : ठाणे जिल्ह्यातील टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील रस्त्याची कामे वेगाने पूर्ण करण्यात येतील, अशी माहिती उद्योग राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीत अपघात होत असल्याबाबत सदस्य रमेशदादा पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या.
टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांची लांबी जवळपास 136 किलोमीटर  आहे. 2004 मध्ये  महामंडळ आणि नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सामंजस्य करार झाला, त्या करारानुसार या मुख्य रस्त्याची व त्याचबरोबर अंतर्गत रस्त्याची  दुरुस्ती,डागडुजी व देखभाल आणि वापराकरिता  सामंजस्य करारानुसार  ती नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली. त्यानुसार जवळपास 136 किलोमीटर पैकी 84 किलोमीटर रस्त्याचे काम 2015 मध्ये पूर्ण झाले. झालेल्या सामंजस्य करारानुसार नवी मुंबई महानगर पालिकेकडून जो मालमत्ता कर आकारला जातो त्यातून ही देखभाल दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. पण तरी सुद्धा काही औद्योगिक संघटना यांनी महामंडळाकडे निवेदन देवून  विनंती केली आहे. त्यानुसार 21 किलोमीटरच्या रस्त्याचे काम सुद्धा महामंडळाने हाती घेतले आहे व हे काम या वर्षी डिसेंबर अखेरीस पूर्ण करण्यात येईल. तसेच उर्वरित 30 किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी महामंडळाबरोबर पुन्हा सामंजस्य करार करण्यात करून 15 किलोमीटर रस्ता महामंडळाने व 15 किलोमीटर रस्ता नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येईल. सुमारे दीड वर्षाच्या कालावधीत हे काम पूर्ण केले जाईल. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीत अलीकडे कुठलेही अपघात झालेले नाहीत असे राज्यमंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले.
औद्योगिक क्षेत्रातील ज्या महानगरपालिकेला त्यांच्या मूलभूत सुविधांसाठी जागा लागेल त्यानुसार त्यांनी प्रस्ताव महामंडळाकडे पाठविल्यास त्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येईल. एमआयडीसी क्षेत्रातील गावांना रस्ते, पाणीपुरवठा, गटारी आदी मूलभूत सुविधांसाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी माहितीही राज्यमंत्री तटकरे यांनी दिली.
यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य सर्वश्री सदाभाऊ खोत, निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे यांनी सहभाग घेतला.