महिला क्रिकेटला संजीवनी देणारी लीग

80

महिला क्रिकेटला संजीवनी देणारी लीग

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो: ९९२२५४६२९५

इंडीयन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलला या वर्षी पंधरा वर्ष पूर्ण होतील. २००८ साली जेंव्हा आयपीएलची संकल्पना मांडण्यात आली तेंव्हा अनेकांनी आयपीएल यशस्वी होईल का ? असा प्रश्न विचारला होता त्याला कारणही तसेच होते भारतात अशाप्रकारची लीग पहिल्यांदाच खेळवली जाणार होती विदेशात विशेषतः युरोप आणि आफ्रिकेत फुटबॉल लीग होतात मात्र क्रिकेटची लीग ती ही भारतात हे अनेकांना पचनी पडत नव्हते त्यामुळे अनेकांनी त्यावर टीका केली होती आज पंधरा वर्षांनी मात्र हीच आयपीएल क्रीडा क्षेत्रातील मोठा ब्रँड बनली आहे.

जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक महागडी लीग म्हणून आयपीलची ओळख आहे. जगभरातील क्रिकेटपटू आयपीएलमध्ये खेळायला मिळावे म्हणून देव पाण्यात घालून बसतात. आयपीएलमुळे क्रिकेटपटू मालामाल झाले. बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड बनले इतकेच नाही तर आयपीएलमुळे क्रिकेटची लोकप्रियता कैक पटीने वाढली. आयपीएलमुळेच भारताला अनेक दिग्गज खेळाडू गवसले. आज भारताचे प्रतिनिधित्व करणारे सर्वच खेळाडू आयपीएलमुळेच भारतीय संघात आले. गाव खेड्यातील खेळाडूंना आयपीलने रातोरात स्टार बनवले. आयपीएलमुळे क्रिकेटची लोकप्रियता गगनाला भिडली त्यामुळेच मागील काही वर्षांपासून मागणी होऊ लागली की पुरुषांप्रमाणेच महिलांचीही प्रीमियर लीग स्पर्धा व्हावी.

भारतातील महिला क्रिकेटला अजूनही म्हणावी तशी लोकप्रियता लाभली नाही. खेळाडूंना हव्या असणाऱ्या सुविधा मिळत नाही. महिला क्रिकेटला लोकप्रिय करायचे असेल आणि देशातील तरुण मुलींना क्रिकेटकडे आकर्षित करायची असेल तर महिलांची आयपीएल असावी अशी मागणी अनेक आजी माजी महिला खेळाडूंनी बीसीसीआयकडे केली होती. पुरुष संघातील खेळाडूंनीही महिला खेळाडूंच्या या मागणीला पाठिंबा दिला होता अखेर बीसीसीआयने यावर्षीपासून महिलांची प्रीमियर लीग खेळण्याची घोषणा केली आणि गेल्या कित्येक वर्षांची प्रतीक्षा संपली. ४ मार्च पासूनच महिलांच्या आयपीएलला अर्थात वुनन्स प्रीमियर लीग ( wpl ) सुरवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच यासाठी खेळाडूंचा लिलाव झाला होता.

स्मृती मानधना, हरमाणप्रित कौर यासारख्या स्टार खेळाडूंना संघात घेण्यासाठी संघ मालकांनी कोट्यवधी रुपये मोजले. या लिगमुळे काही खेळाडू कोट्याधीश तर काही खेळाडू लक्षाधीश बनले. या लिगमुळे महिला क्रिकेटपटू मालामाल झालेच मात्र केवळ पैसे मिळवणे इतक्या पुरतीच ही लीग मर्यादित नाही या लीगचे अनेक फायदे आहेत. या लीगच्या निमित्ताने ऑस्ट्रेलिया, इंग्लड, आफ्रिका, वेस्ट इंडिज या देशातील दिग्गज खेळाडू भारतात खेळताना दिसतील.

जगभरातील हे दिग्गज खेळाडू भारतीय खेळाडूंसोबत एक संघात खेळतील त्यामुळे या खेळाडूंच्या अनुभवाचा लाभ भारतातील युवा खेळाडूंना मिळेल. त्यांच्याकडून त्यांना शिकायला मिळेल. प्रत्येक संघात गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणासाठी स्वतंत्र आणि तज्ज्ञ प्रशिक्षक असतील त्यामुळे खेळाडूंना खेळातील बारकावे समजून घेण्यास आणि आपल्या खेळात सुधारणा करण्यास संधी मिळेल. ही लीग स्टार स्पोर्ट या लोकप्रिय वाहिनीवर दाखवली जाणार असल्याने कोट्यवधी भारतीय आणि जगभरातील क्रिकेटप्रेमी घरबसल्या पाहतील त्यामुळे महिला क्रिकेटची लोकप्रियता वाढेल.

या लिगमधील सामने महिला आणि मुलींना मोफत पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे महिला आणि मुली मैदानात सामने पाहण्यासाठी येतील त्यामुळे या मुली क्रिकेटकडे आकर्षित होतील. मैदानावरील सामने पाहून अनेक मुली क्रिकेटमध्ये करियर करण्याचा निश्चय करतील. खेळाडूंनाही मैदानात सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल. या लीगमध्ये खेळणाऱ्या मुलींना आपले कौशल्य दाखवण्याची संधी या निमित्ताने मिळेल. यातीलच काही मुली पुढे जाऊन भारताचे प्रतिनिधित्व करतील. एकूणच महिला क्रिकेटला लोकप्रिय करण्यात आणि महिला खेळाडूंचे नशीब पालटवण्यासाठी ही लीग खूप महत्वाची ठरणार आहे. या लीगमुळे महिला क्रिकेटचे रुपडे पालटणार आहे. महिला क्रिकेटला संजीवनी देणारी ही लीग असेल यात शंका नाही.