पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन “प्रोजेक्ट शक्ती” अंतर्गत “दिव्यांग नागरिकांसाठी मोफत कृत्रिम अवयव वाटप
✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो. 8999904994
गडचिरोली :- जिल्हा हा अतिदुर्गम व माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशिल असल्याने, येथील आदिवासी नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येतात. शासनाच्या या कल्याणकारी योजनांचा लाभ येथील गरजु आदिवासी नागरिकांना मिळावा, यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव प्रयत्नशिल असते. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणुन दिव्यांग नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे जीवन जगता यावे, त्यांचे जीवन सुलभ व्हावे याकरीता पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे मार्गदर्शनाखाली, गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन “प्रोजेक्ट शक्ती” अंतर्गत “दिव्यांग नागरिकांसाठी मोफत कृत्रिम अवयव वाटप शिबिराचा उद्घाटन समारंभ” गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने तसेच रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक 3030, रोटरी क्लब ऑफ नागपूर नॉर्थ, महाविर सेवा सदन व इंडिया ह्रुमॅनिअी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 05 मार्च रोजी पोलीस मुख्यालयातील एकलव्य हॉल येथे पार पडला.
05 मार्च ते 11 मार्च पर्यंत चालणाऱ्या या शिबीरात दिव्यांग नागरिकांसाठी त्यांना दैनंदिन कामकाज सुसह्य करण्यासाठी आवश्यक असलेले कृत्रिम हात व कृत्रिम पाय उपकरणे मोफत वाटप करण्यात येणार असून उद्घाटन समारंभास जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील 40 दिव्यांग नागरीक उपस्थित होते. सदर शिबीरादरम्यान कृत्रिम अवयव उपकरणाची आवश्यकता असलेल्या 250 दिव्यांग नागरिकांनी नाव नोंदणी केलेली आहे.
सदर दिव्यांग नागरीकांचे मोजमाप करुन अत्याधुनिक मशिनरीच्या सहाय्याने तात्काळ जागेवरच जयपूर फुट (पाय) व हात तयार करुन सदरचे कृत्रिम अवयव उपकरणाचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. यासोबतच सन 2015 मध्ये गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण करणारा विनू पोदाळी याची मुलगी सपना विनु पोदाळी हिचा जन्मापासून डावा पाय दिव्यांग असल्याने तिला नवीन कृत्रिम पाय तयार करुन देण्यात आला. यावेळी दिव्यांग नागरिकांना संबोधित करताना पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, दिव्यांग नागरिकांना दिव्यांग प्रमाणपत्र व त्यांना आवश्यक असलेले विविध साहित्य वाटप केल्याने त्यांच्या जिवनाला एक नविन सुरुवात मिळून त्यांचे जीवनमान उंचावण्यात नक्कीच मदत होणार आहे. तसेच दुर्गम-अतिदुर्गम भागातील सर्व दिव्यांग नागरिकांना दिव्यांग योजनेचा लाभ मिळवून देऊन त्यांच्या सर्व समस्या दुर व्हाव्यात यासाठी गडचिरोली पोलीस दल सदैव प्रयत्नशिल राहिल. तसेच 11 मार्च पर्यंत सुरु असणाऱ्या या शिबिराचा दिव्यांग नागरीकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले.
आजपर्यंत गडचिरोली पोलीस दलाकडुन 03 दिव्यांग मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले असून, 1630 दिव्यांग नागरिकांना दिव्यांग प्रमाणपत्र, 990 दिव्यांगांना एसटी प्रवास सवलत योजनेचे प्रमाणपत्र, 1647 दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजनेचे लाभ, 881 दिव्यांग नागरिकांना कृत्रिम अवयव साहित्य (हात-पाय) व इतर साहित्यांचे वाटप करण्यात आलेले आहेत.
उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, मुख्य वैद्यकिय अधिकारी पोलीस रुग्णालय गडचिरोली डॉ. सुनिल मडावी, रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3030 चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजींदर सिंग खुराना, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी विरेंद्र पात्रीकर, ट्रायबल वेलफेअर कमिटी इंटरनॅशनल नागपूरचे डिस्ट्रीक्ट चेअरमन राजीव वरभे, जयपूर फुट कमिटी रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3030 चे, डिस्ट्रीक्ट चेअरमन ज्योतीका कपूर, रोटरी क्लब ऑफ नागपूर नॉर्थची अध्यक्षा मनिषा मंघानी व रोटरी क्लब ऑफ गडचिरोलीचे अध्यक्ष सुनिल बट्टुवार उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व उपविभागिय पोलीस अधिकारी, पोस्टे/उपपोस्टे/पोमकेचे सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय पाटील व पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.