पाणी गुणवत्ता तपासणी गावातील महिलांचे प्रशिक्षण संपन्न
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:-ग्रामीण भागातील पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत प्रत्येक गावातील पाच महिलांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांमुळे गाव पातळीवर पाणी गुणवत्ता तपासणी करण्याकरिता कायमस्वरूपी यंत्रणा उभी करण्यास मदत होत असल्याचे मत पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी व्यक्त केले.
अलिबाग तालुक्यातील चेंढरे ग्रामपंचायतीत पाणी गुणवत्ता तपासणी महिलांचे प्रशिक्षण शुभांगी नाखले यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. पाण्याच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवताना याबाबत नागरिकांत जनजागृती निर्माण करणे, पाणी व स्वच्छतेबाबत त्यांना सजग करण्याचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत गावस्तरावर आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत पाणी गुणवत्ता तपासणी करण्याचे काम केले जाणार आहे.
पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील गावस्तरावर पाणी गुणवत्ता तपासणीसाठी पाच महिलांची निवड केली आहे. यामध्ये आशा सेविका व अंगणवाडी सेविका व बचत गटाच्या महिला कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यांच्यामार्फत गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे फिल्ड टेस्ट किटव्दारे (FTK) पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी केली जाणार आहे व त्यापैकी एक सक्रीय महिलांची प्रशिक्षणासाठी निवड केली आहे. सदर महिलांना तालुकास्तरावर प्रशिक्षण दिले जात आहे.
यावेळी पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड, पाणी गुणवत्ता सल्लागार अदिती मगर, संवाद सल्लागार नेहा थळे, पंचायत समितीच्या समूह समन्वयक रूपाली नाईक उपस्थित होते.
……………….