प्रामाणिकपणे काम केल्यास यश मिळतेच – आशाताई शिंदे
बालाजी पाटील
हिमायतनगर तालुका प्रतिनिधी
94204 13391
9421808760
नांदेड : नवीन गोष्ट शिकण्यासाठी वय लागत नाही. त्यामुळे आयुष्यात जे काही कराल ते मेहनत, चिकाटी आणि प्रामाणिकपणे करा. यश, पैसा, प्रसिद्धी आपोआप त्यामागे येते. ‘सकाळ’ आणि ‘यिन’च्या माध्यमातून तरूणाईला चांगले व्यासपीठ मिळाले असून त्यातून तरूणांनी आपल्या कलागुणांना वाव द्यावा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेविका आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी मंगळवारी केले.
यंग इंस्पिरेटर्स नेटवर्क (यिन) च्या वतीने ‘यिन मिनिस्ट्री’ अंतर्गत जिल्हास्तरीय अधिवेशनाचे महात्मा गांधी मिशनच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन मंगळवारी (ता. पाच) आशाताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर एमजीएम महाविद्यालयाच्या सीएसईच्या विभागप्रमुख प्रा. डॉ. अर्चना राजूरकर, नारायणराव विधी महाविद्यालयाच्या प्रा. रुक्साना पाटील शेख, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष कन्हैय्या कदम, सहायक पोलिस निरीक्षक सविता कलटवार, ‘सकाळ’चे वरिष्ठ बातमीदार अभय कुळकजाईकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. डॉ. राजूरकर म्हणाल्या की, भारतासारख्या विकसनशील देशात खूप काही शिकण्यासारखे आहे. आपल्याला विकसित देश, महासत्ता म्हणून पुढे यायचे असेल तर आपल्यामधील राष्ट्रप्रेम जागृत होण्याबरोबरच चांगले संस्कार मूळापर्यंत रूजण्याची गरज आहे. त्यादृष्टीने चांगली पुस्तके वाचण्यासोबतच आपआपली बलस्थाने ओळखून काम केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सहायक पोलिस निरीक्षक कलटवार यांनी मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची काळजीबाबत माहिती दिली.