कोलाड-आंबेवाडी नाक्यावर बेकायदा मटका जुगार रोजरोसपणे सुरू, हप्त्याचा “प्रसाद” घेऊन पोलीसांना सुगीचे दिवस?

✍️सचिन पवार ✍️

रायगड ब्युरो चीफ

📞8080092301📞

रायगड :- कोलाड-आंबेवाडी नाका येथे बेकायदा मटका जुगार जोमाने सुरू असून पोलीसांना लाखो रूपयांचा हफ्ता पोहोचत असल्यामुळे या अवैध धंद्यावर पोलीस कारवाई करीत नसल्याचे स्पष्ट होत चालले आहे. 

कोलाड येथे आर.डी.सी.सी. बँकेच्या पाठीमागे मटका जुगार, तसेच आंबेवाडी नाका सर्व्हिस रोड येथे देशी दारूच्या दुकानाच्या बाजूला मटका जुगार आणि चिमणी पाखरं असे दोन ठिकाणी मटका जुगाराचे बेकायदा धंदे सुरू असून या अवैध धंद्यांकडून हप्त्याचा “प्रसाद” घेण्यासाठी दर महिन्याला येथे एका पोलीसाची ये-जा सुरू असते. या परिसरात कायदा-सुव्यवस्था ढासळण्याची चिन्हे दिसू लागली असून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. तरूण आणि वयोवृद्ध माणसे येथे मोठ्या प्रमाणात मटका खेळण्यासाठी येत असून या अवैध धंद्याच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या बेकायदा मटका जुगारामुळे महिला वर्गातून देखील नाराजीचा सूर उमटू लागला आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री, पोलीस महासंचालक आणि रायगड पोलीस अधीक्षक यांनी तातडीने या गंभीर समस्येची दखल घेऊन येथील मटका जुगाराविरूद्ध कारवाई करावी अशी मागणी या परिसरातून जोर धरू लागली आहे.

कायदा व सुव्यवस्था काटेकोरपणे राखण्याच्या दृष्टीने “पोलीस” हा महत्वाचा घटक समजला जातो. जनता जेव्हा-जेव्हा अडचणीत सापडते, तेव्हा-तेव्हा ती रक्षणासाठी पोलीसांकडेच धाव घेत असते. म्हणूनच पोलीसांना “जनतेचे रक्षक” असे म्हटले जाते. परंतु एखाद्या ठिकाणी जर पोलीसच अवैध धंद्यांची पाठराखण करून जनतेला त्रासदायक ठरत असतील तर…? हा तर “कुंपणाने शेत खाण्याचा” प्रकार आहे! असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. येथे पोलीस आणि मटका किंग यांचे एक सलोख्याचे नाते निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत पोलीस हा मटका माफीयांची दलाली करीत असल्याचे दिसून आलेले आहे. पोलीस दलासाठी ही अत्यंत शरमेची बाब असल्याचे बोलले जात आहे. परिणामी कोलाड आंबेवाडी नाक्यावरील व सर्व्हिस रोड येथील देशी दारूच्या येथील मटका जुगार तातडीने बंद करावा आणि या अवैध धंद्याला साथ देणाऱ्या पोलीसावर कारवाई करावी अशी मागणी या तक्रारीतून करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here