मुंबईतून 21 करोडचे युरेनियम जप्त, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई.
✒️अभिजीत सकपाळ मुंबई प्रतिनिधी✒️
मुंबई,दि,6मे:- मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक ए.टी.एस ने ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने 7 किलोग्रॅम धोकादायक युरेनियमसह दोन जणांना अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी माघिल अनेक दिवसांपासून युरेनियम विकत घेणा-या ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात 21 कोटी रुपये आहे. काल दुपारी भाभा एटॉमिक रिसर्च सेंटरच्या अधिकाऱ्यांनी हे युरेनियम असल्याची पूर्णत खात्री केली.
या धोकादायक युरेनियमचा वापर स्फोटक बनवण्यासाठी होणार होता का ? याचीही चौकशी केली जाणार आहे. आरोपींनी हे युरेनियम एका खासगी लँबमध्ये त्याच्या प्युअरिटीसाठी तपासले होते. नागपाडा एटीएसने ही कारवाई केली आहे. अबू ताहीर वय 31 वर्ष आणि जिगर पांडे वय 27 वर्ष अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.
अबू ताहीर आणि जिगर पांडे यांना युरेनियम कुठून मिळाले? हा एक मोठा प्रश्न आहे. कारण युरेनियम हाती लागणे ही साधीसुधी गोष्ट नाही. युरेनियम हा एक महत्त्वाचा रासायनिक घटक आहे. अणू ऊर्जा प्रकल्पात विद्युत निर्मितीमध्ये युरेनियमचा वापर केला जातो. त्याशिवाय अन्य लष्करी कामांमध्येही युरेनियम वापरले जाते.