आंदोलक कुस्तीगीरांबद्दल दिल्ली पोलिसांचा व्यवहार निंदनीय

57

आंदोलक कुस्तीगीरांबद्दल दिल्ली पोलिसांचा व्यवहार निंदनीय

रमेश कृष्णराव लांजेवार 

मो.नं.9921690779

देशातील कोणताही खेळाडू असो ती देशाची आन-बान-शान असते आणि आहे.कारण तो जगाचे भ्रमण करून  देशासाठी नाव कमवीतो व पुरस्काराच्या माध्यमातून आणि पदकांच्या माध्यमातून देशाचा तिरंगा संपूर्ण जगात फडकवितो. यावरून देशाची किर्ती व खेळाडूंची कर्तबगारी जगाला दिसून येते.यामुळेच देशात खुशीचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते व सर्वत्र उत्साह दरवळतांना दिसतो.त्यामुळे त्यांचा प्रत्येक स्तरातून सन्मान व्हायलाच हवा.त्यामुळे त्यांच्या अडीअडचणी किंवा आरोप-प्रत्यारोप याबद्दल सामंजस्याने तोडगा निघायला हवा. परंतु कुस्तीगीरांनी भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपांची समाधानकारक चौकशी होत नसल्याने गेल्या 13 दिवसांपासून कुस्तीगीरांचे शांततेत आंदोलन सुरू असताना पोलिसांकडुन दमनशाही सुरू असल्याचे बुधवारी दिसून आले ही बाब निंदनीय आहे व खेळाडूंच्या प्रती अशोभनीय आहे.यावर केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रृजभुषण शरण सिंह यांच्यावर एका अल्पवयीन कुस्तीपटूसह एकूण सात महिला कुस्तीगिरांचे लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. त्यामुळे लैंगिक शोषणप्रकरणी अटकेची कारवाई करावी आणि चौकशीचा अहवाल सार्वजनिक करावा या मागणीसाठी दिनांक 23 एप्रिल 2023 रोज रविवार पासून आघाडीचे कुस्तीगिरांनी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन सुरू केले आहे.परंतु अचानक जंतरमंतरवर निदर्शने करणारे कुस्तीगीर आणि पोलिसांमध्ये दिनांक 3 मे 2023 रोज बुधवारला रात्री गोंधळ उडाला व आंदोलक कुस्तीगीर आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.यामुळे आंदोलकांमध्ये आक्रमकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांबाबत दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली.तरी आंदोलक कुस्तीगीर न्याय मिळेपर्यंत आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितले जाते.

दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतर कुस्तीपटूंनी पदके, पुरस्कार सरकारला परत करण्याची तयारी दर्शवली आहे. आंदोलकांचे म्हणने आहे की आम्हाला जर अशा प्रकारची वागणूक मिळत असेल तर या पदांचा आणि पुरस्कारांचा काय उपयोग? त्यापेक्षा आम्ही पदके आणि पुरस्कार भारत सरकारला परत करून सामान्य जीवन जगतो.पद्यश्री पुरस्कार प्राप्त कुस्तीगीरांना पोलिस धक्का देत होते, शिवीगाळ करत होते.माझ्यासह साक्षीही (मलिक) तिथे होती.पोलीस आमच्याशी गैरवर्तन करीत होते असे बजरंग पुनिया व विनेश फोगट म्हणाला.येवढे होवूनही सरकार बघ्याची भूमिका घेत आहे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.कारण ब्रृजभुषण शरण सिंह सत्ताधारी पक्षाचे खासदार असल्याने सरकार याप्रकणाकडे पाठ फिरवितांना स्पष्ट दिसून येते.

ब्रृजभुषणवर लावलेले आरोप खरे की खोटे याची गांभीर्याने चौकशी व्हायलाच हवी. कारण कोणी जेव्हा आरोप करतो तेव्हा त्यात अर्धसत्य अवश्य असतें व कारवाई नंतर सत्य सामोरं येते.त्यामुळे ब्रिजभुषण शरण सिंह यांच्यावर असलेले आरोप अत्यंत गंभीर,घृणास्पद आणि निंदनीय आहे. त्यामुळे त्यांना भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावर रहाण्याचा तिळमात्र अधिकार नाही. याकरिता त्यांना संपूर्ण पदावरून सरकारने ताबडतोब बरखास्त करून फास्ट ट्रॅक कोर्टच्या माध्यमातून कारवाई व्हायलाच हवी व पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळायला हवा.

बुधवार दिनांक 3 मे 2023 ला भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) च्या अध्यक्षा पीटी उषा यांनी जंतरमंतरवर आंदोलक कुस्तीगीरांची भेट घेऊन सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.पीटी उषा यांच्या भेटीनंतर या वादावर तोडगा निघेल अशी आशा बजरंग पुनिया यांनी व्यक्त केली.परंतू पोलिसांच्या गैरवर्तनामुळे आंदोलनाला वेगळे वळण येवून आणखी आक्रमक झाल्याचे दिसून येते. ब्रृजभूषण शरण सिंह वरील आरोप राजकीय नसुन अती संवेदनशील आणि गंभीर आरोप असुन कुस्तीगीर पटुंच्या लैंगिक शोषणप्रकरणाचे आहेत. त्यामुळे भारतातील संपूर्ण खेळाडूंनी मग तो कोणत्याही क्षेत्रातील असो त्यांनी कुस्तीगीरांच्या आंदोलनाला सोशल मिडियाच्या माध्यमातून,ट्युटरच्या माध्यमातून, वर्तमानपत्राच्या माध्यमातून किंवा आंदोलन स्थळावर जाणवु अशा प्रकारे सर्वच स्तरातून खुले समर्थन करायला हवे.कारण ब्रृजभूषण शरण सिंह वरील आरोप अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे.त्यामुळे देशातील संपूर्ण आजी-माजी खेळाडूंचे समर्थन कुस्तीगीरांना मिळणे अती आवश्यक आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून कुस्तीगीर पटु सरकारला न्याय मागत आहे.परंतु आंदोलक कुस्तीगीर पटु म्हणतात की जोपर्यंत बृजभूषण शरण सिंह यांना जेलमध्ये पाठवत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे ठामपणे कुस्तीगीरांनी सांगितले. त्याचप्रमाणे संपूर्ण पदावरून बरखास्ती सुध्दा आवश्यक आहे.कारण सर्वसामान्य गुन्हेगारांवर ताबडतोब कारवाई होते तर बृजभूषणवर का नाही असा प्रश्न कुस्ती पटुं व सर्वसामान्यांच्या मनात भेडसावत आहे. 

सरकारने लक्षात ठेवले पाहिजे की देशाचा प्रत्येक खेळाडू देशाची पुंजी आहे.त्यामुळे ब्रृजभूषण सारखे अनेक अध्यक्ष येतील आणि जातील. परंतु खेळाडू तयार करायला अनेक वर्षे लागतात. कारण प्रत्येक खेळाडू हा आपल्या मेहनतीने तयार होतो. कुस्तीगिर खेळाडूंचे आंदोलन पहाता आयपीएल क्रिकेटच्या संपूर्ण आजी-माजी खेळाडूंनी आंदोलक कुस्तीगीरांना खुले समर्थन द्यायला हवे.कारण प्रत्येक क्षेत्रातील खेळाडू हा देशासाठी खेळत असतो.त्यामुळे देशाचे सर्वच खेळाडू देशाची आन-बान-शान आहे. जय हिंद!