महावितरणच्या ३२२ कर्मचाऱ्यांचा निवड चाचणीत ‘विक्रमी’ सहभाग, महावितरण राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा

18

महावितरणच्या ३२२ कर्मचाऱ्यांचा निवड चाचणीत ‘विक्रमी’ सहभाग

• १४५’ सर्वोत्तम’ खेळाडू करणार नागपूर परिमंडळाचे प्रतिनिधित्व

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा

📱 8830857351

चंद्रपूर : 6 ऑक्टोबर

महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये असलेली खेळाची जिद्द आणि उत्साह रविवारी बल्लारपूर येथे स्पष्टपणे दिसून आला! आगामी महावितरण राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा – २०२५-२६ मध्ये विजयी पताका फडकवण्यासाठी नागपूर परिमंडळ (नागपूर, चंद्रपूर आणि गोंदिया) सज्ज झाले आहे. या तीन परिमंडलातील शेकडो खेळाडू कर्मचाऱ्यांची अंतिम निवड करण्यासाठी बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकुलात आंतर परिमंडलीय क्रीडा निवड चाचणी स्पर्धा उत्साहाच्या वातावरणात रविवारी पार पडल्या.

या महत्त्वपूर्ण निवड चाचणी स्पर्धेत विक्रमी ३२२ खेळाडू कर्मचाऱ्यांनी आपला उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला. नोकरीच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कर्मचाऱ्यांनी दाखवलेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद, त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील आवड आणि शारीरिक तंदुरुस्ती जपण्याच्या वृत्तीची साक्ष देतो.

खेळाच्या मैदानात अधिकाऱ्यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

बल्लारपूर येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर या निवड चाचणी स्पर्धांचे उद्घाटन चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता हरिश गजभे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना गजभे यांनी खेळाचे जीवनातील महत्त्व स्पष्ट केले आणि कर्मचाऱ्यांनी खेळाडू वृत्ती जपून एकजुटीने परिमंडलाचे प्रतिनिधित्व करावे, असे प्रेरणादायी आवाहन केले.

यावेळी चंद्रपूरच्या अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे, पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता रमेश सानप, नागपूर परिमंडलाचे मानव संसाधन विभागाचे सहायक महाव्यवस्थापक महेश जाधव, तसेच वित्त व लेखा विभागाचे सहायक व्यवस्थापक प्रशांत ठाकरे यांच्यासह अनेक उच्चाधिकारी, कर्मचारी आणि क्रीडा नियोजन समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या सकारात्मक उपस्थितीमुळे सहभागी खेळाडूंचे मनोबल अधिकच उंचावले.

१४५ ‘बेस्ट’ खेळाडू करणार नागपूर परिमंडळाचे प्रतिनिधित्व

या निवड चाचणीचा मुख्य उद्देश अमरावती येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नागपूर परिमंडळाचा (नागपूर, चंद्रपूर आणि गोंदिया) मजबूत संघ निवडणे हा होता. ३२२ खेळाडूंमधून उत्कृष्ट शारीरिक क्षमता आणि कौशल्य दाखवणाऱ्या १४५ खेळाडू कर्मचाऱ्यांची निवड केली जाणार आहे. हे निवड झालेले खेळाडू अमरावती येथील मुख्य स्पर्धेत आपल्या परिमंडलाचे एकत्रित आणि प्रभावीपणे प्रतिनिधित्व करतील.

या निवड चाचणीत खेळाडूंचा कस लावण्यासाठी इन-डोअर आणि आउट-डोअर अशा पंचवीस प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यात सांघिक खेळांमध्ये कबड्डी, खो-खो, वॉलीबॉल, आणि क्रिकेट सारख्या खेळांमध्ये कर्मचाऱ्यांनी आपल्या सामूहिकतेचे आणि संघर्षाचे प्रदर्शन केले. तर वैयक्तिक खेळांमध्ये बुद्धीबळ, कॅरम, बॅडमिंटन यांसारख्या खेळांत कर्मचाऱ्यांनी एकाग्रता आणि वैयक्तिक कौशल्ये दाखवली.

विशेष म्हणजे, या स्पर्धेत पुरुष आणि महिला अशा दोन्ही प्रवर्गातील खेळाडू कर्मचाऱ्यांनी समान उत्साहाने आणि जोमाने सहभाग नोंदवला. प्रशिक्षक आणि निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण निवड चाचणी स्पर्धा शिस्तबद्ध आणि उत्साहाच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडली.

महवितरणच्या आंतर परिमंडलीय क्रीडा निवड चाचणी स्पर्धेत सहभागी खेळाडू कर्मचा-यांसमवेत मुख्य अभियंता हरिश गजबे व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.