यवतमाळ जिल्हा परिषदेच्या एक रस्त्यावर दोन निविदा, गैरप्रकार आला पुढे.

55

यवतमाळ जिल्हा परिषदेच्या एक रस्त्यावर दोन निविदा, गैरप्रकार आला पुढे.

यवतमाळ जिल्हातील उमरखेड तालुक्यातील खरुस ते उंचवडद असा हा रस्ता असून दोन ते तीन किलोमीटर या लांबीत हे काम केले जाणार आहे. 20 लाखांची निविदा रस्ता सुधारणेची तर आठ लाखांची निविदा पॅचेसची आहे.

प्रतिनिधी
यवतमाळ:-  उमरखेड तालुक्यात एकाच रस्त्यावर सुधारणा व दुरुस्तीच्या दोन निविदा काढून त्या मंजूरही केल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळ जिल्हा परिषदेच्या बांधकाम  विभाग क्र. 2 अंतर्गत उमरखेड तालुक्यात उघडकीस आला आहे.

खरुस ते उंचवडद असा हा रस्ता असून दोन ते तीन किलोमीटर या लांबीत हे काम केले जाणार आहे. 20 लाखांची निविदा रस्ता सुधारणेची तर आठ लाखांची निविदा पॅचेसची आहे. पीयूष नामक सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याला ही कामे देण्याचा घाट आहे. वास्तविक हा कंत्राटदार ‘सुशिक्षित बेरोजगार अभियंता’ या वर्गवारीत मोडत नसल्याचे सांगितले जाते. तो बहुतांश इतरांच्या नावे कामे करतो. यवतमाळातीलही एका युवतीच्या रजिस्ट्रेशनवर तो आपली कामे करतो. पीयूषने यापूर्वी पांदण रस्त्यांची तब्बल 27 कामे उमरखेड तालुक्यात केली असून ती बहुतांश गुणवत्तेबाबत संशयास्पद व दुसऱ्याच्या नावे केलेली आहे. त्याने सादर केलेले बहुतांश अंदाजपत्रक सदोष राहते. मात्र दबावतंत्राचा वापर करून आपली कामे मंजूर करून घेतली जात आहे. खरुस ते उंचवडद या रस्त्यावर आधीच 80 व 40 एमएम थर देण्याचे काम झाले15 लाखांच्यावर एकही काम हॉटमिक्स शिवाय झालेले नाही. मग याच कामाला कोल्डमीक्सची मंजुरी कशी असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. पीयूषला हे काम मिळावे म्हणूनच हॉटमिक्सला मंजुरी दिल्याचे सांगितले जाते. एकाच लांबीच्या रस्त्यावर दोन कामे करायची कशी, आधी आठ लाखांचे काम होणार की 20 लाखांचे आदी मुद्दे उपस्थित केले जात आहे. कंपनीतील मित्रत्व व नातेसंबंध सांगून पीयूष ही कामे पदरी पाडून घेतो.

प्रदीप देवसटवार हे उमरखेडचे बांधकाम उपअभियंता असून त्यांच्याकडे जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र. २च्या कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त प्रभार आहे. त्यामुळे नियमबाह्य कामांवर आक्षेप घेणार कोण असा मुद्दा आहे. जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती संपूर्ण जिल्हाभर दर्जेदार व हॉटमिक्सच्या कामासाठी आग्रह धरतात, मात्र आता त्यांच्याच गृह तालुक्यातील विडूळ सर्कलमध्ये बांधकामातील गैरप्रकार पुढे आल्याने ते आता कुणावर कारवाई करतात याकडे नजरा लागल्या आहेत. असाच प्रकार जिल्ह्यात इतरत्र असण्याची शक्यताही बांधकाम वर्तुळातून व्यक्त केली जाते.