मच्छिमार बांधवांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी
जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे आवाहन
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: बुधवार, दी.20 नोव्हेंबर रोजी सकाळी 07.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे मतदान संपन्न होणार असून रायगड जिल्ह्यातील मच्छिमार सहकारी संस्थेच्या सर्व सभासदांनी, नौका मालकांनी, नौकेच्या तांडेल, नौकेचे खलाशी, ओली व सुकी मासळी विक्री करणाऱ्या महिला-भगिनी, जाळे विणणारे मच्छिमार, हाताने मासे पकडणारे मच्छिमार, गावातील सर्व मत्स्य संवर्धक व जलाशयात मासेमारी करणारे सर्व मच्छिमारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी किशन जावळे केले. जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, नितीन वाघवारे, सहायक आयुक्त, मस्त्यव्यवसाय संजय पाटील आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की, रायगड जिल्ह्याला 122 किलोमिटरची सागरी किनारपट्टी लाभलेली आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्हा हा चांगल्या पर्जन्यमानाचा जिल्हा असल्यामुळे येथे गोड्या पाण्याची तळी, तलाव, जलाशय इत्यादी अस्तित्वात आहेत. मतदानाच्या दिवशी मतदान करुनच नौका मासेमारीसाठी समुद्रात नेण्यात यावी, त्याचप्रमाणे सागरी मासेमारी सफरीचे नियोजन करावे. मच्छिमारी हा रायगड जिल्ह्याचा प्रमुख व्यवसाय असून जिल्ह्यात 4 हजार 500 नौका आहेत. यामुळे 25 हजारपेक्षा जास्त लोकांना थेट रोजगार मिळत आहे. गावातील सागरी मासेमारीसाठी गेलेल्या नौका मतदानाच्या दिवशी बंदरात आणाव्यात जेणेकरुन त्यावरील तांडेल, खलाशी इत्यादींना मतदान करता येईल. मतदानाची टक्केवारी वाढावी तसेच लोकशाही बळकट व्हावी, याकरिता सर्वांनी मतदानाचा हक्क बजावुन लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हावे.