*जिल्हाधिकारी किशन जावळे बनले ‘निक्षय मित्र’; घेतली क्षयरुग्णांच्या पौष्टिक आहाराची जबाबदारी*
*रायगड जिल्हा १०० टक्के क्षयमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन मिशन मोडवर*
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग: रायगड जिल्हा १०० टक्के क्षयमुक्त करण्यासाठी आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन मिशन मोडवर कार्यरत आहे. प्रधानमंत्री टी.बी.मुक्त भारत अभियानांतर्गत जिल्ह्यातील क्षयरुग्णांना पोषण आहार कीटची मदत देऊन किमान सहा महिन्यांसाठी दत्तक घेण्यासाठी जास्तीत जास्त संस्था, उद्योग संस्था-समुह, शासकीय अधिकारी, दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. तसेच या अंतर्गत जिल्ह्यातील ५ रुग्णाची जबाबदारी स्वीकारून ते जिल्ह्यातील पहिले ‘निक्षय मित्र’ बनले आहेत.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली क्षयरोग निर्मूलन मोहीम: १०० दिवसांचा विशेष कार्यक्रम अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.बैठकीस जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे , जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जाधव यांसह सर्व आरोग्य अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जावळे म्हणाले, टी.बी. च्या उपचार कालावधीत योग्य पोषण आहार मिळाला नाही तर रुग्णांना उपचार मिळूनही उपचाराचा सकारात्मक परिणाम दिसून येत नाहीत. सकस पोषण आहार मिळाल्यामुळे रुग्णांच्या औषधोपचारात खंड पडत नाही. नियमित विनाखंड औषोधोपचार घेतल्यामुळे रुग्णास पुढील टप्प्यातील टी.बी. होत नाही व तो रुग्ण वेळेत पुर्ण बरा होतो. त्यामुळे उद्योग संस्था, उद्योग समुह, दानशूर व्यक्ती यांनी निक्षय मित्र बनुन या अभियानात सहभाग नोंदवावा. टीबी रुग्णांना दिल्या जाणाऱ्या पौष्टिक आहार किटमध्ये तृणधान्ये, कडधान्ये, वनस्पती तेल, दूध पावडर, फळे, सुका मेवा इत्यादींचा समावेश होतो.
श्री जावळे पुढे म्हणाले आरोग्य विभागाने क्षयरोग रुग्ण शोधून त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यासाठी मोहीम राबवावी, यासाठी तपासणीचे प्रमाण वाढवावे, खासगी रुग्णालयात क्षयरोग रुग्ण आढळल्यास त्यांच्यावर योग्य उपचार होतील याबाबत लक्ष द्यावे. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मोहिमेबाबत आवश्यक प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे, शहरातील झोपडपट्टी भागातही तपासणीचे प्रमाण वाढवावे. औद्योगिक संस्थांचे सहकार्य घेण्याबाबत लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.ग्रामपंचायत स्तरावर आणि शहरातील योग्य उपचार होतील याबाबत लक्ष द्यावे.सर्व क्षयरुग्णांना मोफत निदान, औषधोपचार यासह टीबी कार्यक्रमांतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ दिला जावा. शासनाने निर्धारित केलेल्या उद्दिष्टानुसार क्षयरोग संशयितांचे टेस्टिंग वाढवावे. टीबी-एचआयव्ही ,टीबी-डायबिटीक समव्याधीग्रस्त रुग्णांचे तपासणीचे प्रमाण वाढवावे. जिल्ह्यातील १०० टक्के संमती दिलेल्या क्षयरुग्णांना पोषण आहार मिळण्यासाठी नियोजन करुन जास्तीत जास्त संस्था, दानशूर व्यक्ती यांना निक्षय मित्र बनण्यासाठी संपर्क करावा. क्षयमुक्त ग्रामपंचायत अभियानामध्ये निकष पूर्ण करुन जास्तीत जास्त ग्रामपंचायतीचा सहभाग वाढवावा व क्षयमुक्त ग्रामपंचायत अभियानामध्ये जास्तीत जास्त गावे क्षयमुक्त होतील याचे नियोजन करावे, असे सांगून या कार्यक्रमांतर्गत कामकाजाबाबत आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या. तसेच रायगड जिल्हा क्षयमुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणानी मिशन मोडवर काम करावे असे निर्देश श्री जावळे यांनी दिले.