विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त साऱ्या जगाचे विनम्र अभिवादन 

51

प्रज्ञा सूर्याच्या दिव्य तेजा समोर भारतासह अवघे जग कृतज्ञतापूर्वक नतमस्तक

बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) ०६ डिसेंबर अर्थात विश्वरत्न, महामानव, बोधीसत्व, प्रज्ञा सूर्य, प्रकांड पंडित, विद्येचे महामेरू, अथांग ज्ञानाचा महासागर, भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. याच दिवशी आधुनिक भारताचे शिल्पकार, थोर कायदेतज्ज्ञ, घटनातज्ज्ञ, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, संसदपटू , महान लेखक, पत्रकार , संपादक , महान तत्त्वज्ञ, शिक्षणमहर्षी , बॅरिस्टर , मनुस्मृतीचे निर्दालक, तमाम भारतीयांचे भाग्यविधाते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे १९५६ रोजी दिल्ली येथील निवासस्थानी त्यांचे निधन झाले. या दिवसाला महापरिनिर्वाण दिन असे संबोधले जाते. ०६ डिसेंबर हा माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून देणाऱ्या महान मानवतावादी समता दूताचा आणि एका प्रखर राष्ट्रभक्ताच्या, निस्सीम देशभक्ताच्या निधनाचा दिवस. त्यामुळे ०६ डिसेंबर हा दिवस संपूर्ण देश विदेशात दुःखाचा दिवस म्हणून समजला जातो.

या दिवशी संपूर्ण देश विदेशातून लाखोंच्या संख्येने बौद्ध धम्म अनुयायी,भीमसैनिक, लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, आमदार, खासदार, मुख्य मंत्री,उप मुख्यमंत्री, राज्यपाल , प्रधानमंत्री, राष्ट्रपती आणि विविध खात्यांचे मंत्री ०६ डिसेंबर ला मुंबई येथील दादर चैत्यभूमी आणि देश विदेशात ज्या ज्या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे, स्मारक आणि त्यांनी आपल्या आयुष्यभर केलेल्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या क्रांतीच्या ऐतिहासिक ठिकाणी जाऊन त्यांच्या प्रेरणादायी पुतळ्याला विनम्र अभिवादन करून कृतज्ञतापूर्वक नतमस्तक होतात.

याच पार्श्वभूमीवर या वर्षी ०६ डिसेंबर रोजी मुंबई येथील दादर चैत्यभूमी, नागपूर दिक्षाभूमी,महाड क्रांतीभूमी, आणि देश विदेशातील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारके, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शासकिय संस्था व सरकारी, निमसरकारी शाळा, महविद्यालये, कार्यालयात, प्रत्येक विहारात आणि घराघरात विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना व प्रतिमांना आदराने सन्मानपूर्वक पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन करून देश विदेशासह अवघे जग नतमस्तक झाले.