सातारा बारा वर्षांच्या मुलाचा खून; पोलिसांनी एकास घेतले ताब्यात.
सातारा :- सातारा तालुक्यातील म्हसवे येथे लमाण वस्तीत राहणार्या बारा वर्षीय मुलाचा उसाच्या शेतात दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही घटना मंगळवारी लमाण वस्तीपासून अर्धा किलोमीटर अंतरावर असणार्या संब्याचा माळ, पिराचा माळ परिसरात घडली. बुधवारी रात्री या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. गंगाराम रमेश राठोड असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.खुनाची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक सजन हंकारे, तसेच तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. शिवीगाळ झाल्याच्या कारणावरून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बाजूलाच आठ ते दहा दगड पडलेले दिसून आले. या घटनेनंतर पोलिसही अवाक झाले होते. त्यांनी परिसराचा पंचनामा करून वेगाने तपास सुरू केला.
यानंतर पोलिसांनी गंगाराम अथवा त्याच्या कुटुंबाचा कोणाशी वाद झाला होता का, याची माहिती घेण्यास सुरुवात केली. या वेळी त्याच परिसरात एका 16 वर्षीय मुलाचा आणि गंगारामचा किरकोळ कारणावरून वाद झाला असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे संशयित म्हणून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असता त्याने खून केला असल्याची कबुली दिली. यानंतर त्या मुलाला ताब्यात घेण्यात आले होते. या घटनेनंतर म्हसवे परिसरात खळबळ उडाली आहे.