स्पॉटलाईट: सुरक्षिततेच्या नियमांकडे कानाडोळा नको

57

स्पॉटलाईट: सुरक्षिततेच्या नियमांकडे कानाडोळा नको

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो: ९९२२५४६२९५

तारखेला सगळीकडे नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत होत असताना आपल्या राज्यात मात्र दोन मोठ्या दुर्घटना घडल्याने नवीन वर्षाच्या उत्साहावर पाणी पडले. वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारी रोजी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील जिंदाल पॉलिफिल्म या कंपनीला लागलेल्या भीषण आगीत १४ कामगार गंभीर जखमी झाले तर दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जखमींमधील ४ ते ५ कामगार अत्यवस्थ असल्याने मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

 इगतपुरीच्या या कंपनीला लागलेल्या आगीने हळहळ व्यक्त होत असतानाच त्याच दिवशी बार्शी तालुक्यातील पांगरीजवळील शिराळा येथेही भीषण आग लागल्याची बातमी आली. बार्शी तालुक्यातील शिराळ्या या गावात फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत नऊ जणांचा अक्षरशः होरपळून मृत्यू झाला तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी या दोन दुर्घटना घडल्याने महाराष्ट्र शोक सागरात बुडाला अर्थात अशाप्रकारच्या दुर्घटना घडण्याच्या आपल्या राज्यातील या पहिल्याच घटना नाहीत. 

याआधीही अशा अनेक दुर्घटना घडल्या आहेत. अशा दुर्घटनांची आपल्याला सवयच झाली आहे कारण आपल्या राज्यात अशा दुर्घटना सातत्याने घडतात. दुर्घटना घडली की टीव्ही चॅनलवर काही काळ ब्रेकिंग न्यूजची पट्टी झळकते. नेते, अधिकारी घटना स्थळी धाव घेतात. टीव्हीवर बाईट देतात. मृतांना आणि जखमींना नुकसानभरपाई दिली जाते. दुर्घटनेची चौकशी करण्याची घोषणा होते. त्यासाठी एक चौकशी आयोग नेमला जातो. या चौकशी आयोगाचे पुढे काय होते हे गुलदस्त्यातच राहते. दुर्घटनेस कोण दोषी आहेत ? त्यांना काय शिक्षा होते हे कोणालाच समजत नाही. 

काही दिवसांनी लोकही या दुर्घटना विसरतात. मग पुनःव काही दिवसांनी अशीच एखादी दुर्घटना घडते मग तोच सोपस्कार पार पाडला जातो. या किंवा अशाप्रकारच्या दुर्घटनेत सर्वसामान्य नागरिकांचा जीव जातो. काहींना कायमचे अपंगत्व येते पण येथे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाचे मोल शून्य आहे. गरीबच आहे, सर्वसामान्य नागरिक आहे तो मेला काय आणि जगला कोणाला काय फरक पडणार आहे? अशीच मानसिकता सर्वांची झाली आहे. याच दुर्घटनेत जर एखादा उच्चपदस्थ अधिकारी किंवा सिलिब्रेटी मेला असता तर ती मोठी बातमी ठरली असते. अर्थात अशा दुर्घटना वारंवार घडूनही आपण त्यातून काहीही बोध घेत नाही हे ही तितकेच खरे आहे.

 कंपन्या, कारखाने किंवा प्रकल्पांमध्ये अशा प्रकारच्या दुर्घटना का वाढत आहेत याचा विचार शासन आणि प्रशासनाने करायला हवा. बेफिकिरी आणि सुरक्षा विषयीच्या नियमांची योग्य अंमलबजावणी न करणे हे या दुर्घटनामागचे महत्त्वाचे कारणे आहेत. औद्योगिक दुर्घटनेमध्ये एक गोष्ट ठामपणे सांगता येते ती म्हणजे जर सुरक्षा विषयक नियम पाळले आणि सावधगिरी बाळगली तर तिचा अंदाज नक्की येऊ शकतो. मात्र बऱ्याचशा औद्योगिक दुर्घटनांनंतर असे स्पष्ट झाले आहे की बेफिकीरपणा किंवा सुरक्षिततेच्या नियमांकडे कानाडोळा केल्यामुळेच बहुतांशी अपघात घडतात.

 बॉयलर जुना झालेला असणे, पाईपलाईनमध्ये गळती असणे. प्रकल्पाच्या आतील एखादा व्हॉल्व्ह बंद असल्यामुळे दबाव प्रचंड प्रमाणात वाढणे किंवा इंधनाचा प्रवाह अचानक वाढणे अशा कारणांमुळे अशा आगी लागतात म्हणूनच या सर्व बाबींची वेळेवर तपासणी होणे गरजेचे आहे. तपासणीकडे जिथे कानाडोळा होतो तिथे दुर्घटना होतेच म्हणूनच औद्योगिक कंपन्या, कारखाने आणि प्रकल्पाध्ये अधिकची काळजी घेणे गरजेचे आहे.