मिडीया वार्ता न्यूज
नवी दिल्ली :’फूट पाडणं हा काँग्रेसचा स्वभावच आहे. काँग्रेसने भारताची फाळणी केली. देशाचे तुकडे करून विष पेरलं. आज स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही काँग्रेसच्या या पापाची शिक्षा देशातील सव्वाशे कोटी भारतीय भोगत आहेत,’ असा जोरदार हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर चढविला.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या ७० वर्षाच्या राजकारणाची चिरफाड केली. यावेळी मोदींच्या भाषणात विरोधकांनी गोंधळ घातला. पण या विरोधाची पर्वा न करता मोदींनी लोकसभेत जोरदार भाषण करत काँग्रेसवर हल्ले चढविले. ‘काँग्रेसने ९० हून अधिक वेळा अनुच्छेद ३५६ मध्ये दुरुस्ती करून राज्य सरकारांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काँग्रेस कोणत्या तोंडाने लोकशाहीच्या गप्पा मारत आहे?,’ असा सवाल मोदींनी केला. ‘जर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्याऐवजी सरदार पटेल असते तर आज काश्मीर पाकिस्तानकडे नसते. काश्मीरची समस्या कधीच सुटली असती,’ असंही मोदी यांनी सांगितलं.
भूसंपादनाबाबतचा अध्यादेश पत्रकार परिषदेत फाडणाऱ्यांनी लोकशाही बद्दल बोलू नये, असे सांगत त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींवरही निशाणा साधला. काँग्रेसने जबाबदारीने काम केले असते तर जनतेच्या सामर्थ्यामुळे देशाची प्रगती झाली असती, असं सांगतानाच काँग्रेसने योग्य धोरण आखले असते तर देश आज काही पटींनी पुढे असता, असे ते म्हणाले. राष्ट्रपतींचे अभिभाषण हे कोणत्या एका पक्षाचे नसते. ते सर्वांचे असते. विरोधकांना विरोधाचा अधिकार आहे. पण माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका, असे त्यांनी सांगितले. काँग्रेसला वास्तवाची जाणीव असती तर त्यांची ही अवस्था झाली नसती. भाजप सरकारने देशात बदल घडवले. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर सरकारने भर दिला, असे सांगत त्यांनी सरकारी कामांचा पाढाच वाचून दाखवला. गोरगरिबांना ‘आधार’चा लाभ मिळू लागला तर आता तुम्ही आधारवर टीका करताय, असा संतापही त्यांनी व्यक्त केला. देशात आता प्रामाणिकतेचा उत्सव सुरु असून लोक प्राप्तिकर भरण्यासाठी पुढे येत आहेत. त्यांनी दिलेल्या पैशांचा सरकार हिशोब देईल असा विश्वास लोकांना वाटू लागलायं, असे मोदी यांनी सांगताच सत्ताधाऱ्यांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत केले.