मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह विधान?, भाजप पदाधिकाऱ्याला काळं फासलं, नेसवली साडी.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी शिरीष कटेकर यांना काळं फासलं आणि साडी नेसवण्याचा प्रयत्न केला.

पंढरपूर :- संपुर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पक्षा तर्फे विज बिल माफी करिता मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु आहे. पंढरपूर येथील भारतीय जनता पक्षाचे नेते आणी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनात भारतीय जनता पक्षाचा नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या बदल आक्षेपार्ह शब्दात टिका केल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला.
वाढीव वीज बिलाविरोधात भाजपनं केलेल्या आंदोलनानंतर आता पंढरपूरमध्ये शिवसेना आक्रमक झाली आहे. भाजपचे माजी उपजिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांनी वीज बिला विरोधातील आंदोलनात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याचा शिवसेना पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी शिरीष कटेकर यांना काळं फासलं आणि साडी नेसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत पुढील प्रकार टाळला. या घटनेमुळे पंढरपूर शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
वाढीव वीज बिलाविरोधात शुक्रवारी भाजपनं राज्यभरात आंदोलन केलं. अनेक शहरांमध्ये महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकलं आहे. पंढरपूरमध्येही भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपचे माजी उपजिल्हाध्यक्ष शिरीष कटेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.

“सांगली, सातारा परिसरात अतिवृष्टी झाल्यावर शेतकऱ्यांना 50 हजार रुपये मदत करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. पण आता मात्र त्यांनी फक्त 5 हजार रुपये दिले. सामान्य शिवसैनिकांना मुख्यमंत्री करु असं म्हणणारे उद्धव ठाकरे स्वत:च मुख्यमंत्रीपदी बसले. बायकोचं लुगडं धरुन घरात बसतो. बाहेर पडत नाही. का तर कोरोना होईल म्हणून”, अशा शब्दात कटेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय.