माणगांव तालुक्यात मटका जुगार, चिमणी पाखरं जोमात! पोलीस प्रशासन मात्र कोमात !
माणगांव – विशेष प्रतिनिधी
माणगांव :-माणगांव तालुक्यात मटका जुगार, चिमणी पाखरं मोठ्या प्रमाणात राजरोसपणे सुरु आहेत.शहरातील गल्लीबोळात छुप्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी चालविण्यात येणारे मटका जुगाराचे अड्डे आता खुलेआम चालविले जात आहेत. या मटका चालविणाऱ्यांना कोणाचेही भय राहिले नाही. तालुक्यात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या मटका जुगाराने पुन्हा डोके वर काढले आहे. मटका जुगाराचा बाजार जोमात असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. कित्येक वेळा माणगांव पोलिसांनी काही बुकी चालकांच्या मुसक्या देखील आवळल्या. परंतु त्यानंतर काही दिवसांनी जैसे थे… खुलेआम मटका सुरू असल्याचे बोलले जात आहे.
मटका जुगार, चिमणी पाखरं खुलेआमपणे सुरू असल्याचे वृत्त अनेक वेळा प्रसिद्ध झाले होते. तरीही मटका जुगार, चिमणी पाखरू सुरू कसा असा सवाल जनतेमधून बोलले जात आहे. कितीही काहीही केले तरी मटका जुगाराचा बाजार सुरूच राहतो. यावरून पोलिसांचा अवैध व्यवसायिकांवर धाक नाही की, काही पोलिसांची पडद्याआडून दोस्ती आहे, असा प्रश्न जनतेमधून उपस्थित केला जात आहे. तसेच हे धंदे माणगांव पोलीस ठाणे हद्दीत निजामपुर रोड रिक्षा स्टँड शेजारी , बामणोली रोड देशी बार बाजूला , मोरबा रोड तसेच हायवे रोड लगत कार्तिक हाॅटेल समोर क्लब असे राजरोसपणे मटके जुगार चिमणी पाखरे चालु आहेत. या चालणाऱ्या अनधिकृत मटका जुगार, चिमणी पाखर याच्या नादात अनेकांचे कुटुंब उद्धवस्त झाले आहेत. आदिवासी समाजातील महिला – पुरुष दिवस रात्र त्या ठिकाणी आकडे लावण्यासाठी आलेले असतात. काही अशी लोक आहेत की, दिवसभर काम करून दिवसाचे 300/- रु. घ्यायचे आणि ते तिथेच मटक्याच्या नादात घालवायचे. काहींनीतर आपल्या जवळ असणाऱ्या छोट्या मोठ्या गाड्या देखील विकल्या आहेत. हे धंदे ज्याठिकाणी त्या ठिकाणाहून वयोवृद्ध, महिला, शाळा, कॉलेजचे विद्यार्थांची नेहमीच वरदळ सुरु असते. काही ठिकाणी तर मद्यपिंचा धिंगाणाच चालू असतो. यावर कुठेतरी आळा बसावा आणि हा मटका जुगार, चिमणी पाखरं कायमस्वरूपी बंद व्हावा अशी चर्चा नाक्या नाक्यावर ऐकायला मिळत आहे. याकडे माणगांव पोलिसांनी जातीने लक्ष घालून हे जुगाराचे धंदे बंद करावेत असे सुशिक्षित नागरिक बोलत आहेत.