लेख :- स्त्री…..

लेख :-

स्त्री…..

स्त्री – तेजाचं, सहनशीलतेचं प्रतिक..! काय सांगावं तिच्याबद्दल, जितकं सांगावं तितकं कमीच..! सतत विचार येते की, कुठून येत असेल इतकं बळ तिच्यात, की सर्वच तिला पचवता येईल, समावता येईल, झेलता येईल..देवाने तिची निर्मितीच अप्रतिम केली आहे, एक विशाल असं आकाशापरी हृदय तिला प्रदान केलं आहे; हे वरदानचं म्हणावे लागेल.
कितीही थकली असो, कितीही दुःखी असो हसू मात्र कुठून आणते हे तिचं तिलाच ठाऊक? कितीही उदासीनता असेल, नैराश्य असेल पण चेहऱ्यावर प्रसन्नता दिसेलचं तिच्या. काही दुखलं सुकलं तरी मी नाही केलं तर कोण स्वयंपाक करेल, कसं होईल माझ्या घराचं- पोरांचं, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच अगदी उठून उभी होऊन कामाला लागत असते. म्हणजे असं म्हणावं की तीने आपल्यात एक हॉस्पिटलच जिवंत ठेवलं आहे, आणि ती स्वतःच दुरुस्त होत असते.
किती तळमळ तिची साऱ्या घरासाठी, समाजासाठी..एखादी नोकरी करणारी स्त्री किती प्रसन्नता ठेवून जगत असते. दिवसभर नोकरी करत असेल तरी 24 तास तिचं लक्ष्य घरातच राहते. नोकरी सांभाळूनही सगळ्यांची मन जपत असते. घरातील आर्थिक परिस्थिती बिघडली असेल तर ती सावरायलाही तिच पुढे येत असते, काही महिला तर संपूर्ण घरातील जबाबदाऱ्या स्वीकारून कर्ता पुरुषांसारख्या झटत आहेत आजही आणि पुढेही झटत राहतील, पण तिच्या या झटण्याला किंमत मात्र शेवटी शून्यचं. तिची बरोबरी करता येत नाही म्हणून तिची बदनामीही करायला लोकं मागेपुढे पाहत नाही. तरीही हे सर्व सहन करत, दुर्लक्ष करत ती पुढे जात असते. स्वतःच सांत्वन स्वतःच करत असते. फक्त या आशेनं की एक दिवस सर्व ठीक होईल. काही स्त्रिया तर फक्त मुलांसाठी वाया गेलेल्या नवऱ्यासोबत आजही संसार करतांना दिसतात, आणि यासाठी की मी घर सोडून गेली तर मुलांचं काय होईल. नेहमी हेच झुरणं घेऊन स्त्री जगत असते.
मुलं कितीही मोठी असो पण दुचाकी स्वतः चालवून मुलांना मागे बसणारी आई बरेचदा दिसते. त्यामागे तिचा उद्देश एकच, आणि तो म्हणजे की ती गाडी चालवतांना अगदी काळजीपूर्वक चालवते कारण, तिची लेकरं तिच्या गाडीवर असतात. आणि ती त्यांना कधीच पडणार नाही हा एक विश्वास तिला असतो. इतकी बलशाली ती आहे. अशी बरीच उदाहरणे आहेत स्त्री जन्माची, तिच्या शक्तीची जे शब्दात मांडता येणार नाही आणि मांडण्याचा प्रयत्न जरी केला तरी शब्दचं अपूर्ण पडतील. स्त्री ही खूप बलशाली आहे, तिला या साऱ्या विश्वात कोणीही हरवू शकत नाही. आई, बहीण, पत्नी आणि मुलगी हे तिचे चार किरदारचं अगण्यं, अतुलनीय आहेत. या चार रूपात जे प्रेम ती पुरुषाला देते त्याचं उपकार किंवा परतफेड कधी करता येत नाही. अशा या वाघिणीला, रणरागिणीला माझा कोटी कोटी प्रणाम….!
मी प्रत्येक स्त्रीला आज महिला दिनानिमित्त प्रत्येक महिला प्रगत व्हावी, सक्षम बनावी, उंच उंच भरारी घ्यावी ही आशा करते व सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते. सरते शेवटी माझ्या स्त्रीसाठी काही ओळी…

जीवन तुझं गं किती संघर्षमय
बलिदानाला तुझा तोड नाही
दोन घरची लक्ष्मी असून तू
दोन्ही घरी परकीच राही…….

ना उमेद, ना आस तुजला
ना असे काहीच तुझे मागणे
मिळावे थोडे प्रेम नि आदर
विश्वाला नित्य असे तुझेचं देणे…..

कोण तुला काय देईल
कोणीच नाही तुझा उद्धारक
माया, ममता तुझ्याच पदरी
तूच तुझ्यासाठी आहेस पूरक….

फेडू नाही शकणार कोणी
इतके तुझे उपकार आहेत
सहनशक्तीची परिसीमाचं तू
साऱ्यांस नित्य घेत राही कवेत….

📚 *तक्षशील* 📚
सौ. उषा शिलवंत घोडेस्वार
(संचालिका उज्वल व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र, साकोली भंडारा)
मो. 8830089212