मुंबई

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील (एसआरए) घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी वांद्रे येथील ४६२ कोटी रुपये मूल्याची ३३ घरे जप्त केली. ही सर्व मालमत्ता मे. पिरॅमिड डेव्हलपरची असून, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मिळण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर केल्याचा कंपनीवर आरोप आहे. याविरोधात पीएमएलए अंतर्गत गुन्हा नोंदवला होता. या घोटाळ्यात काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दिकी यांचाही संबंध समोर आल्याचे समजते.

‘ईडी’ने गेल्यावर्षी मार्चमध्ये या कंपनीच्या विविध मालमत्तांचा तपास केला होता. या मालमत्तांचा संबंध बाबा सिद्दिकी यांच्याशी आढळून आला आहे. मुंबई पोलिसांकडून नोंदवल्या गेलेल्या ‘एफआयआर’ची दखल घेत ‘ईडी’ने तपास सुरू केला. त्यात संशयित आरोपींनी वांद्रे पश्चिमेतील जमात-ए-जमुरिया सहकारी गृहनिर्माण संस्थेस मंजुरी मिळवण्यासाठी राज्य सरकारची फसवणूक करताना रेशन कार्ड, फोटो पास, दुकाने-आस्थापना परवान्याची खोटी कागदपत्रे सादर केल्याचे ‘एफआयआर’मध्ये नमूद केले आहे. ही सर्व बोगस कागदपत्रे झोपडपट्टी पुर्नविकास मंडळाच्या कार्यालयात मंजुरी मिळण्याच्या उद्देशाने सादर केल्याचे ‘ईडी’ने म्हटले आहे. याच बोगस कागदपत्रांच्या आधारे जादा चटईक्षेत्र निर्देशांक लाटण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here