पैशांसाठी बाप उठला मुलाच्या जिवावर; थिनर शिंपडून जाळले
राजेंद्र झाडे
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
बेंगरुड निणावी :-खात्याची अचूक माहिती न दिल्याच्या रागातून वडिलाने आपल्याच मुलाला जिवंत जाळले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. शेजाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी वडिलाला अटक केली. दीड कोटी रुपयांच्या हिशोब बरोबर न दिल्याने हा प्रकार घडला. ही घटना बेंगळुरूमध्ये दोन दिवसांपूर्वी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, व्यापारी वडील सुरेंद्र आणि २५ वर्षीय मुलगा अर्पितमध्ये दीड कोटी रुपयांच्या खात्याच्या सेटलमेंटवरून वाद झाला होता. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, घाबरलेला अर्पित स्वतःला वाचवण्यासाठी घराबाहेर पडला. त्याच्या अंगावर थिनर शिंपडलेले होते. तो सतत वडिलांना माफ करण्याची विनंती करीत होता. परंतु, वडील काहीही ऐकायला तयार नव्हते.
काही वेळातच वडिलांनी माचिसची काडी जाळल्यानंतर फेकून दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. काही वेळातच अर्पितच्या शरीराला आग लागली. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर गुरुवारी अर्पितचा मृत्यू झाला. शेजाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी वडिलाला अटक केली आहे.
लोकांचा विश्वास बसे ना
पैशासाठी बाप आपल्या मुलाला जिवंत जाळू शकतो यावर अजूनही लोकांचा विश्वास बसत नाही. सुरेंद्र हे दुकान चालवतात आणि दुकानाच्या दीड कोटीच्या हिशोबावरून पिता-पुत्रांमध्ये भांडण झाल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सध्या सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी वडिलाला अटक करण्यात आली आहे.