महिला कुस्तीपटूंना न्याय द्या !

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

ज्या भारतीय महिला कुस्तीपटूंनी देशासाठी ऑलिम्पिक, आशियाई, राष्ट्रकुल आणि जागतिक स्पर्धेत पदकांची लयलूट करून देशाचे नाव उज्ज्वल केले त्याच महिला कुस्तीपटूंना चार महिन्यात दुसऱ्यांदा आंदोलन करावे लागत आहे. चार महिन्यांपूर्वी भारताच्या महिला कुस्तीपटूंनी लैंगिक अत्याचार प्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन केले त्यावेळी त्यांना या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते त्यामुळे त्यांनी त्यावेळी आंदोलन स्थगित केले होते मात्र चार महिने उलटूनही ब्रिजभूषण सिंगवर कोणतीही कारवाई झाली इतकेच नाही तर त्याचा राजीनामाही घेतला नाही त्यामुळे महिला कुस्तीपटू पुन्हा जंतरमंतरवर आंदोलनाला बसले. त्यालाही आता बारा दिवस उलटले तरीही या आंदोलनाची दखल सरकारने घेतली नाही.

आंदोलन करणारे कुस्तीपटू ऊन- पावसाची पर्वा न करता तीन दिवसांपूर्वी डास आणि पावसाशी सामना करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी बळाचा वापर केला. महिला कुस्तीपटूंवर पोलिसांना लाठीहल्ला केला. या लाठीहल्लयाने व्यथित झालेल्या कुस्तीपटूंना अश्रू अनावर झाले तरीही सरकारला या आंदोलनाची दखल घ्यावीशी वाटली नाही. सरकारच्या या असंवेदनशीलतेचा जितका निषेध करावा तितका कमी आहे. देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार होतो हेच संतापजनक आहे. प्रश्न ब्रिजभूषण सिंग यांचा नाही ते कोणत्या पक्षाचे आहेत याचाही नाही प्रश्न आहे तो नैतिकतेचा, महिलांच्या आत्मसन्मानाचा. कुस्तीपटूच नाही तर देशातील कोणत्याही महिलेने लैंगिक अत्याचाराची तक्रार केली तर त्याची तातडीने चौकशी व्हायला हवी मात्र आपल्या देशात अलीकडे परिस्थिती खूप बदलली आहे.

आरोपी हा कोणत्या पक्षाचा, कोणत्या विचारधारेचा, कोणत्या धर्माचा आणि कोणत्या जातीचा आहे ते पाहून कारवाई होते. हे सर्व भयानक आहे त्याहूनही भयानक म्हणजे सोशल मिडियावर एक गट या महिला कुस्तीपटूंची खलेआम मानहानी करत आहे. हे आंदोलन परदेशातून पुरस्कृत केले जात असून आंदोलन करणारे सर्व कुस्तीपटू हे देशद्रोही आहेत अशाप्रकारच्या पोस्ट जाणीवपूर्वक सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत. ही सर्व परिस्थिती चीड आणणारी आहे. ज्या कुस्तीपटूंनी देशाचे नाव जगभर उज्ज्वल केले, ज्यांनी देशाचा गौरव वाढवला, ज्यांनी भारताचा तिरंगा जगभर अभिमानाने फडकवला त्यांच्या वाट्याला जर हे येत असेल तर ते देशाचे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.

सरकारने या आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंच्या सहनशीलतेचा अंत न पाहता त्यांनी केलेल्या आरोपांची सखोल चौकशी करावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत ब्रिजभूषण सिंग यांचे निलंबन करावे. चौकशीत जर ते दोषी आढळले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. सरकारने महिला कुस्तीपटूंची अधिक अवहेलना न करता त्यांना न्याय द्यावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here