शिवराज्याभिषेकच्या निमित्ताने संपूर्ण गडकिल्ल्यांची जोपासना करण्याचा “संकल्प”सरकारनी घ्यावा

54

शिवराज्याभिषेकच्या निमित्ताने संपूर्ण गडकिल्ल्यांची जोपासना करण्याचा “संकल्प” सरकारनी घ्यावा

 

रमेश कृष्णराव लांजेवार

मो.नं.9921690779

नागपूर: छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 ला झाला.त्या निमित्ताने दरवर्षी 6जूनला शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो.छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने राजकीय पुढाऱ्यांनी काही तरी शिकवन घेतली पाहिजे. आज महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे सर्वेसर्वा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजच.राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने राज्यात वाढता अत्याचार,भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी,गरीबी यावर अंकुश लावण्यासाठी सरकारने सर्वोतोपरी प्रयत्न केले पाहिजे.त्याचबरोबर शिवरायांचे ब्रिदवाक्य लक्षात ठेवले पाहिजे ते म्हणजे “भुकेलेल्यांना अन्न व प्रजेची सेवा” यापध्दतीने सरकारची वाटचाल असायला पाहिजे.यातुनच आपल्याला शिवाजी महाराजांचे खरे दर्शन घडुन येईल.शिवरायांचे स्वप्न साकार करण्यासाठी सरकारने संपूर्ण गडकिल्ल्यांची जोपासना करावी. महाराजांनी रयतेच्या जीवांसाठी मोगलांशी दोन-दोन हात केले तेव्हाच हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली.त्यामुळे सरकारने शिवाजी महाराजांचे आदर्श सामोरं ठेवुन जनतेच्या सुख-दु:खात सहभागी व्हायला पाहिजे.

शुक्रवार 19फेब्रुवारी 1630 साली शिवाजी महाराजांचा जन्म झाला.त्यामुळे दरवर्षी  शिवजयंती 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते. त्याचप्रमाणे इतर संभाव्य तारखांमध्ये 6 एप्रिल 1627(वैशाख शुद्ध तृतीया) ही सुद्धा जन्म तारीख मानली जाते.त्यानुसार महाराष्ट्राबाहेर अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस मानतात.महाराष्ट्रात शिवजयंतीच्या तारखेला महत्व नसुन त्यांचे कर्तुत्व,त्यांचा त्याग,रयतेची जबाबदारी आणि लाखोंनी सैन्य घेऊन चढाई करणाऱ्या मोगल साम्राज्याचा अंत करणे हे महत्वाचे होते.ज्याप्रमाणे शिवजयंती घराघरात साजरी केली जाते त्याचप्रमाणे “राज्याभिषेक सोहळा”घराघरात साजरा व्हायला पाहिजे.शिवाजी महाराजांची जन्मतारीख किंवा राज्याभिषेकची तारीख याला महत्व न देता शिवाजी महाराज आपल्या अंतःकरणात व हृदयात कसे बसेल याकडे सर्वांनीच लक्ष देण्याची गरज आहे.आजच्या परीस्थितीत शिवाजी महाराजांचे आचरन अंगीकारतांना जनतेच्या सेवेला व समस्यांना महत्व देण्याची गरज आहे.यातच आपल्याला खरा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा दिसून येईल.

शिवाजी महाराजांइतकी सेवा कोणीही करू शकत नाही.परंतु खासकरून राज्यकर्ते व राजकीय पुढाऱ्यांना मी सांगू इच्छितो की जनतेच्या समस्या,भुकेलेल्यांना अन्न, रोजगार याकडे जरी लक्ष दिले तर शिवाजी महाराजांचे स्वप्न अवश्य साकार होईल असे मला वाटते.जोपर्यंत सुर्य-चंद्र, आकार-पाताळ आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांचा जयजयकार घराघरात व सर्वांच्या हृदयात आपल्याला दिसुन येईल.मी तर म्हणेल की शिवजयंती किंवा राज्याभिषेक सोहळा रोज साजरा व्हावा आणि शिवाजी महाराजांचे गोडवे जनतेपर्यंत पोहचवावे. तेव्हाच भारतात एकच नाही तर लाख शिवाजी तयार होतील.कारण सर्वांनाच कल्पना आहे की एक मावळा हजार मोगलांवर भारी पडत असे तेव्हाच संपूर्ण गडकिल्ले शिवाजी महाराजांना जिंकता आले.कारण त्याकाळी मोगलांना प्रत्येक मावळा शिवाजी वाटत असे यामुळेच मोगल छत्रपती शिवाजी महाराजांपासुन भयभीत होते. शिवाजी महाराजांच्या पुण्याइने आज आपण ताठ मानाने, स्वाभिमानाने जगत आहोत व मोकळा श्वास घेत आहोत.शिवाजी महाराजांनी गनीमीकाव्याने मोगलायीचा व मोगल साम्राज्याचा अंत केला व हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.त्यामुळे मोठ्या थाटात व उत्साहाने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो.याचा गर्व महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला आहे.

आज भारताची गौरव गाथा जी आपण ऐकतो त्याचे संपूर्ण श्रेय शिवरायांनाच आहे.शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्रासह संपूर्ण भारताची अबाध्य शक्ती आहे.शिवराज्याभिषेकच्या निमित्ताने शिवाजी महाराजांचे विचार समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचले पाहिजे.जानता राजा, रयतेचा राजा,हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणून जगभर ख्याती प्राप्त आहे.त्यामुळे केवळ महाराष्ट्रातच किंवा भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते.तत्वज्ञ, इतिहासकार शिवाजी महाराजांवर अभ्यास करण्यासाठी भारतात येतात.19 फेब्रुवारी रोजी सुमारे 111 पेक्षा अधिक देशांमध्ये शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येते.

असे सांगण्यात येते की शिवाजी महाराजांकडे अनेक जातीवंत घोडे सुध्दा होते.कोणत्या घोड्यांचा वापर केव्हा करायचा हे त्यांना चांगलेच अवगत होते.शिवाजी महाराजांकडे मोती, विश्र्वास, तुरंगी,  इंद्रायणी, गाजर, रणभीर, कृष्णा असे 7 घोडे होते.शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करतांना सुमारे 400 गड आपल्या अधिपत्याखाली आणले होते.काही गड त्यांनी स्वत: बांधले तर काही किल्ले लढाया करून जिंकले. महाराजांचा एक गडकिल्ला म्हणजे स्थापत्यशास्त्र, व्यवस्थापन आणि गनिमी काव्याचे प्रतिकच होते. त्यामुळे मी सरकारला आग्रह करतो की महाराष्ट्रातील संपूर्ण गडकिल्ल्यांची देखरेख करून सुसज्जीत केलेपाहिजे.यातुनच शिवरायांना खरा मानाचा मुजरा ठरेल.

कारण गडकिल्ले महाराष्ट्राची आण-बाण-शान आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील गडकिल्ले ही भारताची धरोहर आहे.कारण गडकिल्ल्यामुळेच  शिवरायांच्या आठवणी पुन्हा-पुन्हा जागृत होतात व नवीन उर्जा निर्माण होते.गडकिल्यांची सुरक्षा म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने महाराजांना खरे अभिवादन व मानवंदना ठरेल.कारण शिवरायांनी मुठभर मावळ्यांच्या साक्षीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली व संपूर्ण किल्ले काबीज केले हा अभिमान महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला आहे.त्यामुळे इतिहास जागृत ठेवण्यासाठी संपूर्ण किल्ले पर्यटनाच्या दृष्टीने व शिवरायांची आठवण या उद्देशाने किल्ल्यांची जोपासना करणे गरजेचे आहे.

393 वर्षांनंतर आजही कुठल्याही गडकिल्ल्यांवर गेले तर 4 हजार फूट उंचीवर भर उन्हाळ्यात आपल्याला किल्ल्यावर स्वच्छ पाणी प्यायला मिळते.हा संपूर्ण शिवरायांचाच प्रताप आहे.असे सांगण्यात येते की वयाच्या 17 व्या वर्षी शिवरायांनी स्वत: डिझाईन करून रायगड किल्ला बांधल्याचे सांगण्यात येते.आई जगदंबेच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांनी आपले संपूर्ण काम फत्ते केले व मावळ्यांमध्ये उर्जा निर्माण करून मोगलांना भुईसपाट केले.अबझल खानासारख्या महाकाय शक्तीशाली सरदाराला गनीमीकाव्याने यमलोक पोहचवीले.अशाप्रकारे मोगलांच्या संपूर्ण सरदारांना एक-एक करून यमलोक पोहचवीण्याचे काम शिवरायांनी, त्यांच्या सरदारांनी आणि मावळ्यांनी केले.हा देश साधुसंतांचा,थोरमहात्म्यांचा, क्रांतीकारकांचा व हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या शिवरायांचा देश आहे.याची जोपासना महाराष्ट्र व केंद्र सरकारने करावी अशी मी आग्रहाची विनंती करतो.

देशात वाढते अत्याचार रोखण्यासाठी, शेतकरी व कामगारांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी शिवरायांच्या तत्त्वांच्या अनुकरणाचा वापर करून केंद्र व राज्य सरकारने रयतेच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारावी व महागाईच्या रूपात निर्माण झालेल्या मोगलांचा सर्वनाश करून रयतेला दिलासा द्यावा.यातच खरे शिवराज्याभिषेकाचे महत्त्व दिसून येईल.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 14 किल्यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक विभागाने म्हणजे युनेस्कोने आंतरराष्ट्रीय वारसास्थळ (वर्ल्ड हेरिटेज साईट) म्हणुन मान्यता दिली आहे.यामुळे जगात महाराष्ट्राची मान आणखी उंचावली आहे.6 जुन शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्याने महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने आरोग्याच्या दृष्टीकोनातून व वाढते प्रदूषण लक्षात घेता पर्यावरणाला वाचविण्यासाठी आजच्या दिवसाला मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याचा संकल्प करावा.यामुळे महाराष्ट्रात हिरवागार गालिचा निर्माण होईल व संपूर्ण गडकिल्ले हिरवेगार दिसतील. शिवरायांना माझा मानाचा मुजरा.    

🚩जय शिवाजी🚩.

हर हर महादेव