जालना जिल्हात मित्रांचा वाद सोडवीण्यासाठी गेलेल्या तरुणाची निर्मम हत्या.

✒ गोपीनाथ मोरे ✒
भोकरदन तालुका प्रतिनिधी
जालना/भोकरदन,दि.6 ऑगस्ट:- जालना जिल्हातील भोकरदन शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मित्रांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा मित्रांनीच खून केल्याची घटना गुरुवारी रात्री 10 वाजताचा सुमारास शहरात घडली. सागर भारत बदर वय 27 वर्ष रा. वालसा-खालसा ता.भोकरदन असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सागर हा हॉटेल चालक होता. दिड महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. या घटनेने खळबळ उडाली आहे.
सागर बदर आपला मित्र कैलास गजानन फुकेचा रा. फत्तेपुर भाऊ सुनीलचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गुरुवारी रात्री भोकरदन-जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये गेला होता. वाढदिवस साजरा झाल्यानंतर जेवण करण्यापूर्वी कैलासला जुना वाद असलेल्या योगेश पुंजाजी फुकेने फोन केला. ‘आपल्यातील जुने वाद मिटवून टाकू. तू फत्तेपूर रोडवरील 132 केव्ही केंद्राजवळ ये’ ,असे सांगत योगेशने कैलासला बोलावून घेतले. कैलासने सागरला सोबत घेत दुचाकीवरून 132 केव्ही केंद्र गाठले. येथे योगेशसोबत हनुमंत फुकेदेखील होता.
या ठिकाणी कैलास व योगेश यांच्यात बाचाबाची झाली. मात्र, सागर व इतरांनी भांडण मिटवले. त्यानंतर कैलास दुचाकी चालविण्यासाठी बसला. त्याच्यामागे दुचाकीवर सागर बसला होता. यावेळी योगेशने सागरच्या पोटात चाकूने वार करून त्याला जखमी केले. त्यामुळे सागर खाली कोसळला, हे पाहताच योगेशने तेथून पळ काढला. कैलास व इतरांनी सागरला भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रक्तस्त्राव जास्त झाल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्याला जालना येथे नेण्यास सांगितले. मात्र, जालना येथे पोहोचण्यापूर्वीच रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सागरचा मृत्यू झाला. याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार झाला आहे.
मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार
मित्रांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या सागरचा विनाकारण खून करण्यात आला असून आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी. आरोपीला अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे सांगत सागरच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. काही वेळानंतर आरोपीला अटक करण्यासाठी विविध ठिकाणी पथक पाठविले आहे. तसेच साक्षीदारांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष घेण्यात येणार आहे. आरोपींना तातडीने अटक करणार असल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर नातेवाईकांनी सागरचा मृतदेह ताब्यात घेतला. वालसा खालसा येथे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.