सोलापुर मध्ये नाशिकच्या सोनाराची 19 कोटी 78 लाखांनी फसवणुक

✒प्रवीण वाघमारे✒
सोलापुर प्रतिनिधी 99234 56641
सोलापुर,दि.6 ऑगस्ट:- सोलापुर मध्ये नाशिक शहरातील सोनार व्यावसायिकाला त्यांच्या मित्राने तब्बल 19 कोटी 78 लाखांनी फसवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. सोनार व्यावसायिक आपल्या पत्नीसमवेत त्याला जाब विचारला असता मित्राने त्यांनाच अश्लिल शिवीगाळ करत धमकावले. याप्रकरणी सोनार व्यावसायिकाने सोलापूरमधील विजापूरनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अमोल सुरेश यादव रा. युनिटी आयकॉन अपार्टमेंट, होटगी रोड, सोलापूर याच्यावर गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे.
पोलिसांकडुन माहितीनुसार, संशयित आरोपी यादव याने सोनार व्यावसायिकास मजरेवाडी-जुळे सोलापूर परिसरातील बॉम्बे पार्कजवळ भूखंड करारनामा करत त्या जागेवर निवासी संकुल बांधण्याचे आमिष देत प्लॉट विक्री करुन नफा मिळेल, असे आश्वासन देत सोनार व्यावसायिकाची फसवणूक केली. सोनार व्यावसायिकाने मित्रावर विश्वास दाखवत बांधकाम व्यवसायात गुंतवणूक करण्याचे ठरविले. मजेरवाडी परिसरातील दोघा जागा मालकांची जागा विकत घेतली होती. यासाठी नाशिक येथील सराफ व्यावसायिकाकडून 2013 ते 2019 या कालावधीत वेळोवेळी 19 कोटी 78 लाखांची रक्कम घेतली होती. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संशयिताने सराफ व्यावसायिकाच्या बनावट स्वाक्षरीच्या आधारे कागदपत्र तयार करुन परस्पर फ्लॅट विक्री केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सोनार व्यावसायिकाने पत्नीसह सोलापुरात येऊन संशयित यादवला जाब विचारला. मात्र, संशयिताने त्यांनाच धमकावले. पत्नीला शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला. त्यामुळे त्यानी पोलिसात तक्रार नोंदवली आहे.