सोलापुरात मित्रच झाला वैरी, 30 हजारांसाठी मित्रानेच केले मित्राचे अपहरण.

✒️प्रविण वाघमारे✒️
सोलापुर प्रतिनिधी 99234 56641
सोलापूर,दि.6 ऑगस्ट:- सोलापुर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मित्रच मित्राचा वैरी झाला. तीस हजार रुपयांसाठी मित्रानेच मित्राचे अपहरण केल्याची घटना बुधवारी घडली आहे. विशाल पाटील असे अपहरण केलेल्या तरुणाचे नाव असून, याबाबत विशाल यांच्या पत्नीने गुरुवारी रात्री सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. गुन्हा दाखल होताच बारा तासाच्या आत पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध घेत आरोपींना विजापूर येथून अटक केली आहे.
सोलापुर येथे राहणा-या विशाल पाटील हे चार तारखेला सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास दवाखान्याला जातो असे सांगून घरातून गेले. त्यानंतर ते रात्री घरी आले नाही. दरम्यान, विशाल यांच्या आईंच्या मोबाईलवर अपहरणकर्त्यांनी फोन करून तीस हजार रुपयांची मागणी केली व ही घटना पोलिसांना सांगितल्यास विशालची हत्या करण्याची धमकी दिली. याप्रकरणी विशालची पत्नी पूजा पाटील यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद देताच पोलिसांनी बारा तासाच्या आत आरोपींना अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक कमलाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.ई अल्फाज शेख, पोलीस हवालदार खाजप्पा आरेनवरु, पोलीस नाईक दयानंद वाडीकर, पोलीस कॉन्स्टेबल गणेश कानाडे यांनी केली.