सासुरवाडीतून परतताना रस्त्यात गाठलं, कोयता अन् बेसबॉलच्या दांड्यानं बेदम मारलं; कुख्यात गुंडाची हत्या
त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोटर मो 9096817953
नागपूर.नागपूर शहरातील यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजीव गांधी नगर पुलिया परिसरात गुरुवारी पहाटे कुख्यात गुन्हेगार समीर शेख उर्फ येडा शमशेर खान (वय ३०) याची निर्घृण हत्या करण्यात आली.वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं असून मुख्य आरोपी अशुसह त्याच्या टोळीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. मृतक समीर शेख हा राजीव गांधी नगरचा रहिवासी असून परिमंडल क्रमांक ५ अंतर्गत त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, मारहाण, एमपीडीएसह तब्बल ३१ पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. तो गांजाची तस्करी आणि अन्य गुन्हेगारी कारवायांसाठी परिसरात कुख्यात होता.
पोलिस सूत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार, समीर हा गुरुवारी पहाटे मोमिनपुरा येथील आपल्या सासुरवाडीतून घरी परतत असताना त्याच्यावर घातपात झाला. अशु नामक गुन्हेगार आणि त्याच्या टोळीतील सदस्यांनी पूर्वनियोजित कट रचून कोयते आणि बेसबॉलच्या दांड्यांचा वापर करत त्याच्यावर हल्ला केला. हे हल्लेखोर त्याच परिसरात राहत असून, हत्या घडवून आणल्यानंतर ते फरार झाले आहेत. विशेष म्हणजे ही घटना अशुच्या घराजवळच घडल्याने संशय आणखी बळावतो आहे.
हल्ल्यानंतर समीर शेख गंभीर जखमी झाला होता. घटनेची माहिती मिळताच यशोधरा नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता, त्यामुळे पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्तही तैनात केला.
या हत्येमागे स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांमधील वर्चस्वाची लढाई असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. समीर शेख व अशु यांच्यात मागील काही काळापासून वाद सुरु होता. त्याचेच रूपांतर अखेर हिंसक हत्येत झाल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलीस तपास करत आहेत. आरोपी अशु आणि त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.