मराठी भाषेची अवहेलना करणाऱ्या परप्रांतीय नागरिकाला मनसे विद्यार्थी सेनेची समज
सिद्धेश पवार,
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
8482851532
पोलादपूर. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषा वाचवण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महाड तालुक्यातील एका परप्रांतीय नागरिकाने मराठी भाषेची अवहेलना करताना दिसणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
याची तात्काळ दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला मनसेच्या शैलीत समज देत चांगलेच धारेवर धरले. संबंधित परप्रांतीय नागरिक महाडमधील एका विद्यालयात स्कूल बस चालक म्हणून कार्यरत आहे. त्याला मराठी भाषेचा आदर राखण्यास सांगण्यात आले.
तसेच, संबंधित शाळेच्या नावाचा फलक मराठीत लावण्याचे निर्देश देण्यात आले. शाळेमध्ये व शालेय वाहतुकीत मराठी भाषेला प्राधान्य देण्यात यावे आणि यापुढे अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, यासाठी खबरदारी घेण्याची ताकीदही यावेळी देण्यात आली.
या वेळी मनसे विद्यार्थी सेनेचे द. रायगड जिल्हा उपाध्यक्ष विवेक ठोंबरे, महाड तालुका अध्यक्ष अथर्व देशमुख, पोलादपूर तालुका अध्यक्ष ओंकार मोहिरे, महाड तालुका सचिव मयूर बहिरम, तालुका उपाध्यक्ष रोहित सावंत, विभाग अध्यक्ष सुयश कदम तसेच इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.