नागपुरात पुन्हा लॉकडाऊन, पालकमंत्री नितीन राऊत यांची घोषणा

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
Mo 9096817953
नागपूर:- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात सणांदरम्यान कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. तर नागपूर जिल्ह्यात तिसऱ्या लाटेने पाऊल जिल्ह्यात टाकले आहे, असे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान, नागपूर शहरात कोरोना संदर्भात जे आकडे समोर येत आहेत, ते पाहता पुन्हा कडक निर्बंध लावण्याची गरज निर्माण झाली आहे, असे नितिन राऊत यांनी सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागपूरला लॉकडाऊनला सामोरं जावं लागेल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यासंदर्भात चर्चा झाली असून एकमत झाल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले आहे. त्यामुळे नागपूरमध्ये सध्या सुरू असलेल्या दुकानांच्या वेळात बदल करण्यात येणार आहेत. तसेच हॉटेल, रेस्टॉरंटच्या वेळेत देखील बदल करण्यात येणार असल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन कोरोना निर्बंध आणि लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर हे निर्बंध अंमलात येतील, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे.
नितीन राऊत यांनी म्हटलं आहे की, कोरोना संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत जी आकडेवारी समोर आली आहे त्याचे गांभीर्य लक्षात घेता नागपूर शहरात आणि ग्रामीण परिसरात पुन्हा एकदा कडक निर्बंध लावावे लागणार आहेत. आतापर्यंत आकडेवारी एकेरी होती मात्र आता ती दोन नंबरी झाली आहे. आज १३ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. दुसरी लाट संपली आणि तिसरी लाट येणार आहे. अशात तिसऱ्या लाटेने पावलं टाकलेली आहेत. जवळपास ७८ सँम्पल जीनोम सिक्वेन्सीसाठी पाठवले आहेत. त्यामध्ये काय अहवाल येतोय ते पाहावं लागेल.