सर्जा – राजा आणि बळीराजाच्या सन चला पोळा सर्व मिळुन साजरा करुया. कष्ट करणार्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करुया.

✒️प्रशांत जगताप✒️
कार्यकारी संपादक मिडिया वार्ता न्यूज
9766445348
आला पोळा सन सर्जा राजाचा
बळीराजाचा आनंद भिडे गगनाला..1
रंगाने नाहाला बैल राजा
गोंडे झुंबर शोभे शिंगाला
बळीराजाचा आनंद भिडे गगनाला..2
अंगावर घालूनी मखमली शाल
सुंदर अशी डौलदार चाल
वाढवीत होती बळीराज्या शान
बळीराजाचा आनंद भिडे गगनाला..3
कष्टाने सुगंध दळवळला
बळीराज्याचा मळा फुलला
बैल राजा प्रति ऋणी राहुनी आज
बळीराजाचा आनंद भिडे गगनाला..4
बैला शिवाय शेतीला उपमाच नाही
शेतक-या शिवाय मातीला सुगंध नाही
कष्टा शिवाय पोशनकर्त्याला स्थान नाही
बैला शिवाय शेतक-याला मानच नाही
आला पोळा सन सर्जा राजाचा
बळीराजाचा आनंद भिडे गगनाला..5
प्रशांत जगताप यांची कविता
चला सर्जा- राजाचा आला पोळा सन सर्व मिळुन उत्साहवर्धक वातावरण साजण करुन शेतकरी राजा आणि बैलाच्या कष्ट प्रति कृतज्ञ राहूया. पोळा म्हणजे शेतकरी बांधवाचा एक प्रमुख सन. एक मंगलपर्वच म्हणता येईल. या दिवसाला शेतकरी बांधवांच्या चेह-या वरील आनंद सार काही सांगून जाते. या सणासाठी शेतकर्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल सर्वात उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या पत नुसार त्याचा साजशृंगार करुन बैलाला छान सजवितात व गावात भरणा-या पोळ्यात हिहिरिने भाग घेतात. पोळ्याच्या दिवशी गावातल्या सर्व बैलजोड्या ढोल, ताशेच्या आवाजात एकत्र आणल्या जातात. आणि उत्साहवर्धक वातावरण पोळा साजरा केला जातो. पोळ्याला ‘बैलपोळा’ असे देखील म्हणतात. पोळा हा श्रावण महिन्यातील अमावास्याच्या दिवशी साजरा करण्यात येतो. वर्ष भर शेतात राबुन कष्ट करणा-या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे.
भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. त्यामूळे भारताच्या विकासाचा शेतकरी हा केंद्र बिंदू आहे. त्यामूळे शेतकर्यांत या सणाला विशेष महत्त्व आहे. या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो. शेतात पीकधान्य झुलत असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात. एकूण सर्वत्र आनंदाचे वातावरण असते.
सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा.’ या दिवशी, बैलांचा थाट असतो. त्याची दिवाळी असते. या दिवशी त्यांना कामापासून आराम असतो. तुतारी (बैलांना हाकण्यासाठी वापरण्यात येणारी काडी ज्याचे टोकास, बैलांना टोचण्यासाठी टोकदार लोखंडी खिळा लावला असतो) वापरण्यात येत नाही. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदी, ओढय़ात नेऊन धुण्यात येते. नंतर चारून घरी आणण्यात येते. या दिवशी बैलाच्या खोंडाला (मान व शरीराचा जोड-खांदा) हळद व तुपाने (सध्या महागाईमुळे तेलाने) शेकले जाते. त्यांच्या पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झूल (एक प्रकारचे चादरीसारखे आवरण), सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, मटाट्या (एक प्रकारचा श्रुंगार), गळ्यात कवड्या व घुंगुरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा (आवरायची दोरी), पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे, खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य.
बैलाची निगा राखणार्या ‘बैलकरी’ घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात. या सणासाठी शेतकर्यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजश्रुंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात. गावाच्या सीमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस ‘झडत्या’ (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे. त्यानंतर, ‘मानवाईक’ (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील, श्रीमंत जमीनदार) यांच्यातर्फे तोरण तोडले जाते व पोळा ‘फुटतो’. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात. मग त्यांना घरी नेऊन ओवाळण्यात येते. बैल नेणार्यास ‘बोजारा’ (पैसे) देण्यात येतात. असा हा पोळ्याचा सण आहे.