बँकेच्या प्रशिक्षणासाठी आलेल्या महिलेवर वर्ध्यात अत्याचार

62

बँकेच्या प्रशिक्षणासाठी आलेल्या महिलेवर वर्ध्यात अत्याचार

मुकेश चौधरी प्रतिनिधी

वर्धा :- देशात आणी राज्यात महिला अत्याचाराचे अनेक प्रकरण ताजे असतानाच आता एका महिला बँक कर्मचाऱ्यावर हॉटेलच्या खोलीत डांबून बळजबरीने रात्रभर शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन उस्मानाबाद येथील एका युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपीस जेरबंद करण्याचे मोठे आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे.

लातूर जिल्ह्यातील खंडपार तालुक्यातील २१ वर्षीय पीडितेने बीसीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एनआयटी कॅम्पसमध्ये मुलाखत दिली. यात तिची निवड झाल्यानंतर ४५ दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर पीडितेची वर्धा येथील एका बँकेत बँकर कस्टमर आॅफिसर म्हणून नियुक्ती झाली. १३ मार्च २०२० पासून ती वर्धा येथील रामनगर परिसरातील मुलींच्या वस्तीगृहात राहत होती. काही दिवसानंतर पीडितेची आरोपी कुणाल अनिल पवार रा. उस्मानाबाद याच्याशी ओळख झाली. आरोपी कुणाल हा पीडितेला वारंवार फोन करुन त्रास देत होता. ही बाब पीडितेने तिच्या आईला सांगितली. पीडितेच्या आईने आरोपी कुणालला समजावून सांगितले. तरी देखील कुणाल हा रात्री अपरात्री फोन करुन पीडितेला त्रास द्यायचा. ११ सप्टेंबर रोजी आरोपीने फोन करुन शहरातील एका हॉटेलमध्ये बोलाविले. पीडिता त्याला भेटण्यास गेली असता आत्महत्या करण्याची धमकी देत बँक सुटल्यावर रात्री हॉटेलमध्ये येण्यास सांगितले. पीडिता घाबरुन हॉटेलमध्ये गेली असता आरोपीने तिला हॉटेलच्या तिस-या माळ्यावरील एका खोलीत नेले. खोलीत डांबून तोंड बांधून रात्रभर तिचे शारीरिक शोषण केले. अखेर याची माहिती पीडितेने आई-वडिलांना दिल्याने आई-वडिलांनी वर्धा गाठत तिला लातूरला घेऊन गेले. याप्रकरणी आरोपी कुणाल पवार विरुद्ध तक्रार दिली असता घटनास्थळ वर्धा असल्याने प्रकरण शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

पीडितेला हॉटेलमध्ये बोलावून एका खोलीत डांबून आरोपी नराधमाने ११ ते १४ सप्टेंबर तब्बल चार दिवस शारीरिक शोषण केले. पीडिता ओरडत होती पण, कुणीही तिच्या मदतीस धावले नाही. १५ सप्टेंबर रोजी सकाळी आरोपी कुणाल याने पीडितेस खोलीत डांबून स्वत: तेथून पसार झाला.

पीडितेवर झालेल्या अत्याचाराने तिची प्रकृती बिघडली होती. मात्र, ही बाब कुणाला सांगावी हे कळत नव्हते. त्रास वाढल्याने पीडिता शहरातील एका खासगी महिला रुग्णालयात पीडितेने उपचार घेतले. मात्र, त्रास असहाय्य झाल्याने पीडितेने तिच्या लहान बहिणीस सर्व आपबिती सांगितल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.