ठाण्यात गांजाची तस्करी करणाऱ्यास अटक: ५७ हजारांचा गांजा हस्तगत*

56

*ठाण्यात गांजाची तस्करी करणाऱ्यास अटक: ५७ हजारांचा गांजा हस्तगत*

ठाणे : ठाण्यात गांजाची तस्करी करणा-या दीपक दत्ता मोहिते (५२, रा. पनवेल, जि. रायगड) यास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने सोमवारी अटक केली. त्याच्याकडून ५७ हजारांचा चार किलो ९२० ग्रॅम गांजा आणि रोकड असा ६९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दीपक हा त्याच्या अन्य एका साथीदारासह उथळसर येथील एमटीएनएल कार्यालयासमोर गांजाच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार रवींद्र काटकर यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त दीपक देवराज आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ५ आॅक्टोबर रोजी दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक आणि हवालदार रवींद्र काटकर यांच्या पथकाने सापळा रचून दीपकला महानगर टेलिफोन निगमच्या उथळसर येथील कार्यालयासमोर ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये ५७ हजारांचा गांजा, रोकड आणि इतर साहित्य असा ६९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस अ‍ॅक्ट कलम ८-क, २०-ब, २९ नुसार राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपकला ९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्याच्या अन्य एका साथीदाराचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.