वाघाच्या हल्ल्यात एकाचा बळी. ७० टक्के भाग खाल्ल्या वाघाने

55

वाघाच्या हल्ल्यात एकाचा बळी. ७० टक्के भाग खाल्ल्या वाघाने.
चंद्रपूर :-  जिल्हातील चांदा वनविभागातील राजुरा वनपरिक्षेत्रात वाघाने हल्ला करून एकाचा बळी घेतला आहे. सदर इसम सोमवारी सायंकाळी जंगलात गेला होता. त्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी सापडला. या भागातील वाघाचा उपद्रव कायम असून व्याघ्र हल्ल्यात २१ महिन्यांत आतापर्यंत ८ जणांचा बळी गेला आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. स्थानिक लोकांचा मनात भीतीचे वातावरण निर्माण झाल आहे.
राजुरा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १७८ मध्ये खांबाडा या गावातील मारोती पेंदोर (७०) हा इसम जळाऊ लाकूड आणण्यासाठी जंगलात गेला होता. बराच उशीर झाला तरी घरी न परतल्याने बेपत्ता मारोतीचा मंगळवारी शोध घेण्यात आला. तेव्हा वाघाने हल्ला करून मारोती पेंदोर यास ठार केल्याचे उघडकीस आले. त्या भागातच त्याचा मृतदेह आढळून आला. वाघाने त्याच्या शरीराचा जवळपास ७० टक्के भाग खाल्ल्याचं आढळून आलं आहे.

राजुरा व विरूर वनपरिक्षेत्रासह आसपास धुमाकूळ घालणाऱ्या या वाघाने मागील २१ महिन्यांत हल्ला करून आठ बळी घेतले आहेत. त्या हल्लेखोर वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांची परवानगी यापूर्वीच मिळाली असून दोनदा मोहिमेची मुदत वाढविण्यात आली होती. ३० सप्टेंबर रोजी याबाबतची मुदत संपल्यावर पुन्हा तिसऱ्यांदा मोहिमेस मुदतवाढ मिळाली आहे. दरम्यान हल्लेखोर वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी शोधमोहीम सुरू असून आता मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.