लाडक्या बहिणींची फसवणूक चित्रलेखा पाटील यांचा सरकारवर आरोप

लाडक्या बहिणींची फसवणूक चित्रलेखा पाटील यांचा सरकारवर आरोप

लाडक्या बहिणींची फसवणूक
चित्रलेखा पाटील यांचा सरकारवर आरोप

लाडक्या बहिणींची फसवणूक चित्रलेखा पाटील यांचा सरकारवर आरोप

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग :- राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. यातून महिलांना महिन्याला दीड हजार रुपये दिले. परंतु, दुसऱ्या बाजूला दैनंदिन व्यवहारातील वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढविल्या आहेत. लसणासह कांदे-बटाट्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. या महागाईमुळे महिला वर्गात संताप निर्माण झाला आहे. एका खिशातून पैसे द्यायचे आणि दुसऱ्या खिशातून पैसे काढायची ही सरकारची भुमिका आहे. लाडक्या बहिणींकडून पैसे घेऊन त्यानांच त्यांचे पैसे दिले जात आहेत. आपल्याच करातील पैशातून सरकार आपलेच पैसे देत आहे. याची जाणीव प्रत्येक महिलेला असणे आवश्यक आहे. सरकार लाडक्या बहिणींची फसवणूक करीत आहे, अशी टीका शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी सोमवारी (दि.7) केली.

रायगड जिल्हा महिला बचतगट फेडरेशन पुरस्कृत लेक शिवबाची अंतर्गत भव्य महिला संवाद मेळावा वैजाळी हाशिवरे येथील बालवीर मैदानात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी चित्रलेखा पाटील म्हणाल्या.
यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा तथा अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, उरण तालुका शेकाप महिला आघाडी प्रमुख सीमा घरत, रायगड जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या उपाध्यक्षा वृषाली ठोसर, संजना कीर, शेकाप उरण शहर अध्यक्षा नैना पाटील, मुळेच्या सरपंच रोशनी पाटील, हाशिवरेच्या सरपंच शैला पाटील, शेकाप महिला आघाडीच्या पदाधिकारी, सदस्या, हाशिवरे विभागातील महिला हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी चित्रलेखा पाटील यांनी सांगितले की, शेकापच्या नेत्या तथा माजी राज्यमंत्री स्व. मीनाक्षी पाटील यांचे रायगडच्या विकासात एक वेगळे योगदान राहिले आहे. या भागातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मीनाक्षी पाटील कायमच अग्रेसर राहिल्या. शेकापचे नेते जयंत पाटील यांच्याबरोबरच माजी आ. पंडित पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्या भावना पाटील यांनीदेखील या विभागात एक वेगळी बांधणी केली आहे. यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन वेगळ्या उमेदीने काम करण्यास पुढे आले आहे. या भागातील पाणी व अन्य प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष कटीबध्द आहे, असे चित्रलेखा पाटील म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या, प्रत्येक समाजाची ताकद ही महिला असते. महिला घराबरोबरच गाव, समाज घडवू शकते. महिला सावित्रीची लेक बनून मुलीला शाळेत पाठवू शकते. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार चुलीपर्यंत पोहचविण्याचे काम महिलाच करू शकतात. समाजात अमुलाग्र बदलासह सर्व घटकाला एकत्र आणण्याचे काम महिलाच करू शकतात. महिलेमध्ये प्रचंड मोठी शक्ती आहे. परंतु आजही महिलांना दुय्यम दर्जाचे स्थान दिले जाते, ही शोकांतिका आहे.
आजची परिस्थिती गंभीर आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत. बदलापूरसारख्या घटना घडत आहेत. त्यामुळे महिलांनी पुढाकार घेऊनच वाईट विकृतीविरोधात लढले पाहिजे. सर्व महिलांनी एक होऊन व्यसनमुक्तीचा संदेश पोहचविण्याचे काम केले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी मजबूत होण्याची गरज आहे. अनेक संकटं उभी राहतील. मात्र त्या संकटावर मात करण्याची क्षमता निर्माण केली पाहिजे. तर समाजात बदल होऊन एक वेगळी क्रांती घडेल, असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.
भविष्यात या परिसरात महिलांना रोजगार मिळेल, यादृष्टीने कारखाना उभा केला जाणार आहे. बचतगट उभारून हजारो महिलांना रोजगाराचे दालन खुले केले करण्याचा प्रयत्न आहे. तसेच रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा लौकिक जगात होत असताना या बँकेतील नोकर भरतीवर शिंदे गटाने स्थगिती आणून हजारो तरुणांचा रोजगार बुडविण्याचे काम केले आहे. त्यामुळे महिलांनी एकजूट होऊन लढले पाहिजे. या भागातील पाण्यासह अनेक रखडलेले प्रश्न सोडविण्यात येतील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

चौकट …
शेकाप शेतकऱ्यांच्या पाठीशी
या भागात अनेक प्रकल्प आले. कंपन्यांनी आश्वासने दिली. परंतु ती आश्वासने पुर्ण केली नाहीत. खाऱ्या पाण्यामुळे येथील सुपिक जमीन नापिक झाली. येथील शेतकरी भरपाईपासून वंचित आहे. या भागात अनेक प्रश्न आहेत. ते सोडविण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष कटीबध्द असून शेकाप शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे आश्वासन चित्रलेखा पाटील यांनी दिले.

चौकट…
कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
वैजाळी हाशिवरे येथील बालवीर मैदानात भव्य महिला संवाद मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यानिमित्ता विभागातील तीसहून अधिक कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. राजकीय, सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक, सहकारी, बँकिंग, सांस्कृतिक, व्यवसायिक, उद्योजक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.