नागपूर येथील महामेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत सवलतींसंदर्भात सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

51

नागपूर येथील महामेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत सवलतींसंदर्भात सकारात्मक कार्यवाहीचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

मुंबई, दि. 6 :- नागपूर महानगरपालिकेअंतर्गत सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेचे दोन स्वतंत्र मार्ग प्रस्तावित आहेत. या महामेट्रो रेल संदर्भातील काम उद्योग व रोजगाराशी संबंधीत असल्याने टाळेबंदीचा विचार करून स्टेशन सभोवतालच्या दोन्ही बाजूस 500 मीटर अंतरापर्यंत अभिक्षेत्र निर्देशांकात (एफएसआय) सवलत देण्यासंदर्भात याचबरोबर खरेदी – विक्री करारपत्रावर सवलत देण्यासदंर्भात सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

आज नागपूर सुधार प्रन्यास व नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थांकडून आकारण्यात येणाऱ्या करांमध्ये टप्प्यानुसार सवलत मिळण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस महसूल विभागाचे उपसचिव संजय बनकर, नगरविकास विभागाचे  प्रणव कर्वे, यासह मेट्रो प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले म्हणाले, टीओडी क्षेत्रासाठी टप्प्या-टप्प्याने अधिमूल्य वसुली करण्यासंदर्भात सवलत देण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेईल. मेट्रोचे काम हे उद्योग आणि रोजगाराशी संबंधीत आहे. संबंधित काम वेळेत पूर्ण झाल्यास रोजगाराच्या दृष्टीने स्थानिकांना याचा लाभ होईल. याचबरोबर मुद्रांक शुल्काबाबत मार्गदर्शक सुचनांमध्ये योग्य ते बदल याबरोबरच खरेदी-विक्री करारावरील शुल्कात सवलती देण्यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतील, असेही श्री.पटोले यांनी सांगितले.