अमरावतीत धारणी तालुक्‍यात एकाच महिन्यात दगावली 17 बालके.

54

अमरावतीत धारणी तालुक्‍यात एकाच महिन्यात दगावली 17 बालके.

आरोग्य विभागातील डॉक्‍टर्स तसेच कर्मचारी हजरच राहत नसल्याचा आरोप ग्रामस्थांचा आरोप.

अमरावती प्रतिनिधी

अमरावती :- एकाच महिन्याच्या कालावधीत एकट्या धारणी तालुक्‍यात १७ नवजात बालके दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. साद्राबाडी, बैरागड या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये हे बालमृत्यू झाल्याची बाब निष्पन्न झाली आहे. आरोग्य विभागातील डॉक्‍टर्स तसेच कर्मचारी हजरच राहत नसल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे.

एकीकडे मेळघाटमधील बालमृत्यू तसेच मातामृत्यूची संख्या वाढत चालली आहे. आरोग्याच्या आधुनिक सोईसुविधांचा अभाव, साक्षरतेचे कमी प्रमाण यामुळे या भागात जास्तीत जास्त बालमृत्यू ओढावतात. तसेच कुपोषणामुळे देखील अनेक बालकांचे मृत्यू होतात. मेळघाटात हे सर्व सुरू असतानाच एका महिन्यात साद्राबाडी आणि बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये 17 बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  विशेष म्हणजे बालमृत्यूप्रमाणेच माता मृत्यूची संख्या सुद्धा वाढल्याचा आरोप जिल्हापरिषद सदस्यांनी केला आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी मुख्यालयी हजर राहत नाहीत, मुख्यालयी असले तरी अनेक कर्मचारी हे आरोग्य केंद्रात ठरलेल्या वेळेत सेवा देत नाहीत, अशा अनेक तक्रारी येत आहेत. तरीही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.