आवास योजनेतील लाभार्थ्यांचा संसार उघड्यावर; योजनांच्या निधीअभावी अर्धवट घरकुलांचे बांधकाम

यवतमाळ:- रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुलाचा चवथा हप्ता मिळाला नाही. परिणामी, जिल्ह्यातील 55 टक्के लाभार्थ्यांचे घरकूल अर्ध्यावरच अडकले आहे. गेल्या चार वर्षांत केवळ 45 टक्के लाभार्थ्यांचे घरकुल पूर्ण झाले आहे. गेल्या दहा महिन्यांपासून रमाई आवास योजनेला निधीच नसल्याने कामे रखडली आहेत.

केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून रमाई आवास योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांची निवड करून वेगवेगळ्या टप्प्यांत चार हप्ते वितरित करण्यात येतात. त्याअनुषंगाने सन 2016-2017 मध्ये एक हजार 666 लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर एक हजार 470 लाभार्थ्यांचे घरकुल पूर्ण झाले. याची टक्‍केवारी 88.24 वर आहे.

2017 – 2018 मध्ये एक हजार 832 लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली होती. त्यातून एक हजार 464 घरकुल पूर्ण झाले असून, 79.92 टक्‍के आहे. शिवाय 2018-2019 मध्ये सहा हजार  902 लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. त्यामधून दोन हजार  686 लाभार्थ्यांचे घरकुल पूर्ण झालेले आहे. तब्बल 62 टक्‍के लाभार्थ्यांना तिसरा व चौथा हप्ता वितरित करण्यात आलेला नाही. परिणामी, लाभार्थ्यांचे घरकुल अपूर्णच असून, त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे.

शासनाने फेब्रुवारी 2020 पासून रमाई आवास योजनेतील एकाही लाभार्थ्यांना निधी उपलब्ध करून दिला नाही. 2019-2020 या वर्षात जिल्ह्याला एक हजार 832 चे उद्दिष्ट होते. एक हजार 884 लाभार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यानंतर एक हजार 756 घरकुलांना मंजुरी प्रदान केली होती. एकाही लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला नाही. गेल्या फेब्रुवारीपासून निधी अदा करण्यात आला नसल्याने आणखी काही दिवस लाभार्थ्यांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

इतर योजनांमधील कामांना गती

पंतप्रधान आवास योजना, कोलाम, शबरी व पारधी आवास योजना शासनस्तरावरून राबविण्यात येतात. या योजनांमध्ये 60 टक्‍क्‍यांहून अधिक लाभार्थ्यांचे घरकुल गेल्या चार वर्षांत पूर्ण झालेले आहे. योजनांमधील लाभार्थ्यांनी घरकुलांच्या केलेल्या बांधकामानुसार त्यांना शासन नियमित हप्ता वितरित करीत आहे. मात्र, रमाई आवास योजनेतील लाभार्थींच्या घरकुलांचे काम निधीअभावी अडकले आहे.

लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज

गेल्या नऊ महिन्यांपासून घरकुलांचा निधी वितरित झालेला नाही. अनेकांच्या घरकुलांचे काम निधीअभावी ठप्प झालेले आहे. कोरोनामुळे इतर विभागांचा निधी यंदा वळता करण्यात आलेला नाही. परिणामी घरकुल योजना पूर्ण करण्यासाठी या विभागांना निधीवळता करण्यात यावा, अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे. याबाबत गांभीर्याने दखल घेऊन खासदार व आमदारांनी या निधीचा तिढा तातडीने सोडवावा, अशी अपेक्षा लाभार्थी व्यक्त करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here