नशा येणारे इंजेक्शन विकणाऱ्या तरुणाला अटक
अलिबाग पोलिसांनी जप्त केले नशा आणणारे इंजेक्शन
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- जीममधील अथवा इतर साहसी खेळ खेळणाऱ्या तरुणांना नशा येणारे इंजेक्शन विकणाऱ्या आक्षी साखरमधील एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी त्याच्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून नशा येणाऱ्या दहाहून अधिक बाटल्या, इंजेक्शन जप्त करण्यात आले आहे. या कारवाईने ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांना दणका मिळाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलिबागमधील साखर आक्षी येथील कोळीवाड्यात एक तरुण मेफेन्टरमाईन गुंगीकारक औषध विकत असल्याची माहिती अलिबाग पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्यासह त्यांच्या पथकाने गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यात मेफेन्टरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या दहा बाटल्या आढळून आल्या. तसेच काही रोकड सापडली. तेथील सूरज मनोज राणे (29) या तरुणाला ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता, जीममध्ये जाणाऱ्या व इतर साहसी खेळ खेळणाऱ्या खेळाडूंना गुंगीकारक औषध बेकायदेशीररित्या विकत असल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांच्या परवानगीशिवाय हा गैरप्रकार तो करीत होता. सर्व मुद्देमाल जप्त करण्या आला. याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रतिक पाटील करीत आहेत. सूरज राणे हा आरोपी आक्षी साखरमधील रहिवासी आहे. तो गावातील फॅब्रिकेशन आणि वेल्डींगच्या दुकानामध्ये हा गैरधंदा चालवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याच्यावर छापा टाकण्यात आला. सूरज राणे याच्याविरोधात यापूर्वीदेखील हल्ला करणे यासारखे गुन्हे अलिबाग पोलीस ठाण्यात दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.