चोंढी पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष
पुलाला झाडा-झुडपांसह गवताने विळखा
देखभाल दुरुस्ती करण्यास बांधकाम विभाग उदासीन
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:-अलिबाग-रेवस मार्गावरील चोंढी पुलाला झाडा-झुडपांसह गवताने विळखा घातला आहे. त्याची देखभाल दुरुस्ती करण्यास बांधकाम विभाग उदासीन ठरला आहे. बांधकाम विभागाच्या या कारभाराबाबत तीव्र नाराजीचे सूर उमटत आहेत.
मांडवा ते गेटवे, भाऊचा धक्का तसेच रेवस ते भाऊचा धक्का, करंजापर्यंत जलवाहतूक सेवा सुरू आहे. या सेवेच्या माध्यमातून वर्षाला लाखो पर्यटक अलिबाग ते मुंबई ये-जा करतात. काहीजण नोकरी-व्यवसायानिमित्ताने, तर काही अलिबाग व मुंबईमध्ये फिरण्यासाठी ये-जा करतात. रस्ते वाहतुकीपेक्षा जलवाहतुकीचा प्रवास कमी वेळेत होत असल्याने जलवाहतुकीला अधिक पसंती दर्शविली जात आहे. सध्या गेल्या काही वर्षांपासून रो-रो सेवा सुरु झाल्याने वाहनांचीदेखील या मार्गावर संख्या प्रचंड वाढली आहे. रस्ता अरुंद असल्याने या मार्गावर अनेक वेळा वाहतूक कोंडीचा प्रश्न भेडसावत आहे.
अलिबाग-रेवस मार्गावरील चोंढी येथील जुन्या पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्यात आला. हा पूल गेल्या अनेक वर्षांपासून वाहतुकीसाठी खुला आहे. पूल रुंद असला तरी या पुलाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूकडील कठड्यांना गवत, झाडा-झुडरपांनी विळखा घातला आहे. वाढलेले गवत, झुडूपे काढण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. अलिबाग-रेवस हा रस्ता आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग झाला आहे. त्यामुळे हा सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या देखभाल दुरुस्तीबाबत हात वर केले आहेत. या पुलाच्या सुरक्षेबाबत संबंधित विभाग उदासीन ठरल्याचे चित्र दिसून येत आहे.
रस्त्याला अतिक्रमणाचा विळखा
अलिबाग ते रेवस मार्ग अतिक्रमणांच्या विळख्यात सापडला आहे. रस्त्याच्या दुतर्फा वेगवेगळ्या प्रकारचे अतिक्रमण वाढले आहे. काही धनदांडग्यांचे बंगलेदेखील या रस्त्याच्या दुतर्फा आहेत. या अतिक्रमणामुळे रस्त्यावरच वाहने अनेकजण पार्किंग करतात. त्याचा परिणाम रस्त्यावरील वाहतुकीवर अनेकवेळा होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. या रस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फा महावितरण कंपनीचे उच्चदाब वाहिनीचे खांब व तारा आहेत. या तारांच्या उंचीचे बांधकाम होत असल्याने सुरक्षेचा प्रश्नदेखील निर्माण झाला असल्याची चर्चा सुरु आहे.
चोंढी पुलाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुलावर वाढलेले गवत, झाडे झुडूप तातडीने काढून पूल सुरक्षेच्या दृष्टीने अधिक मजबूत करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
सौ.संजना पाटील गायकवाड
सदस्य सासवणे ग्रामपंचायत
अलिबाग-रेवस रस्ता यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. परंतु, आता एमएसआरडीसीकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या पुलाच्या ती दुरुस्तीबाबत काहीही बोलू शकत नाही.
मोनिका धायतडक, कार्यकारी अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग