सार्वजनिक बांधकाम विभागात सावळागोंधळ

65

सार्वजनिक बांधकाम विभागात सावळागोंधळ

निविदा प्रक्रियापूर्वीच ठेका

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- सार्वजनिक बांधकाम विभागातील कामकाज गतिमान आणि पारदर्शक व्हावे, म्हणून ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मात्र, याच प्रक्रियेत सावळागोंधळ असल्याचे समोर आले आहे. अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयातील विद्युत कामाची निविदा पूर्ण झाली नसताना ठेकेदारांकडून काम केले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नसताना ठेकेदाराने काम सुरु केल्याचा आरोप होत आहे. या भोंगळ कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

रायगड जिल्ह्यात विशेष म्हणजे अलिबाग तालुक्यात वेगवेगळी कामे करताना कोणत्याही प्रकारची प्रक्रिया पूर्ण न करता केली जात असल्याचा प्रकार घडत आहे. चौलनंतर अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कारभाराबाबतची माहिती समोर आली आहे. अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयात विद्युत विभागामार्फत काम केले जाणार आहेत. रोहित्राबरोबरच केबल टाकण्याचे काम या ठिकाणी केले जाणार आहे. तसेच जिल्हा रुग्णालयातील शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयात तसेच परिसरात पथदिवे, इन्व्हर्टर लावण्याचे काम अलिबागसह मुरूड याठिकाणीदेखील केले जाणार आहे. या कामांसाठी तीस लाख रुपयांहून अधिक निविदा काढण्यात आली आहे. पेण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागातील कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत नोंदणीकृत कंत्राटदारांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. निविदा स्वीकारण्याच्या आणि नाकारण्याचे अधिकारी कार्यकारी अभियंता यांच्याकडे राखून ठेवण्यात आले आहेत. दि. 31 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.त्यानंतर 11 नोव्हेंबरला निविदा उघडली जाणार आहे. मात्र, या निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याअगोदरच एका ठेकेदारामार्फत कामाला सुरुवात करण्यात आली आहे. ही विद्युत कामे गेल्या काही दिवसांपासून सुुरू केल्याची माहिती समोर आली आहे. निविदा प्रक्रिया 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता पूर्ण होणार आहे. तरीदेखील नियमांचे उल्लंघन करीत ठेकेदाराकडून त्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे या निविदा प्रक्रियेच्या कामाबाबत संशय व्यक्त केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा विद्युत विभाग ठेकेदारावर मेहेरबान का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नाही. तरीदेखील कामकाज सुरु केले असल्याबाबत माहिती घेऊन कारवाई केली जाईल.

प्रशांत दोडे, कार्यकारी अभियंता,
सार्वजनिक बांधकाम, विद्युत विभाग, रायगड