ज्योतिबा फुले सामाजिक सभागृह सामाजिक चळवळीचे केंद्र व्हावे – ना. मुनगंटीवार
•पोंभुर्णा येथील सामाजिक सभागृहाच्या लोकार्पण कार्यक्रमात उपस्थिती.
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
8830857351
पोंभूर्णा : 7 डिसेंबर
कुठल्याही गावात एखादे सभागृह बांधल्यावर त्याला महापुरूषाचे नांव देण्याची पध्दत रूढ झाली आहे. पोंभुर्णा येथे क्रांतीसुर्य ज्योतीराव फुले यांच्या नावाने झालेले सभागृह हे त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन सामाजिक चळवळीचे केंद्र व्हावे असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पोंभुर्णा येथे ८० लाख रूपये खर्च करून तयार झालेल्या सामाजिक सभागृहाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. क्रांतीसुर्य ज्योतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी फक्त त्यांच्या समाजासाठीच नाही तर सर्व समाजासाठी काम केले. ज्या काळात त्यांनी हे काम केले तो समाजासाठी अतिशय कठीण काळ होता. अशा प्रतिकुल परिस्थीतीतही न डगमगता जे कार्य ज्योतीराव व सावित्रीबाईंनी केले त्याने सामाजिक क्रांतीची ज्योत समाजामध्ये पेटविल्या गेली. त्याचाच परिणाम म्हणून आज समाज जागृत झाला असून शिक्षण, रोजगार या क्षेत्रात समाजाने उंच झेप घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून माळी समाजासाठी अनेक कार्ये करताना मला अतिशय आनंद होतो. ज्योतीराव फुलेंचे वंशज २०११ मध्ये विधानसभा अधिवेशनादरम्यान उपोषणाला बसले होते. त्यावेळी मी स्वतः उपोषण मंडपाला भेट देवून त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर निरनिराळया सांसदीय आयुधांच्या माध्यमातुन त्यांच्या मागण्या सरकारकडून मान्य करून घेतल्या व त्यांच्या वंशजांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात आले. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नांव देण्यासाठी विधानसभेत विविध आयुधांचा वापर केला व त्यात यश आले याचे अतिशय समाधान झाले. ज्या भिडेवाडयात सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली त्या भिडेवाडयाला राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्याबाबत विधानसभेत अर्धा तास चर्चा उपस्थित केली व त्यासाठी निधी मंजूर करविला. जिल्हयामध्ये ठिकठिकाणी त्यांच्या नावाने सभागृह तसेच ज्योतीराव व सावित्रीबाई यांचे अर्धपुतळे सुध्दा उभारले. समाजाच्या उत्थानात माझाही काही सहभाग असावा यादृष्टीने मी नेहमी प्रयत्न केले व यापुढेही मी पूर्ण शक्तीने समाजाच्या पाठीशी उभा राहीन, अशी ग्वाही याप्रसंगी बोलताना मुनगंटीवार यांनी दिली. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, पोंभुर्णा नगर पंचायत उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा अलका आत्राम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, उपविभागीय अधिकारी संजयकुमार ढवळे, पोंभुर्णा तहसिलदार श्रीमती कनवाडे, नगर पंचायतचे मुख्याधिकारी आशिष घोडे, माजी जि.प. सदस्य राहूल संतोषवार, नगर पंचायतचे विरोधी पक्षनेता आशिष कावटवार, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, माजी पंचायत समिती उपसभापती ज्योती बुरांडे, विनोद देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य गंगाधर मडावी, ऋषी कोटरंगे, पोंभुर्णा नगर पंचायतचे सर्व नगरसेवक व नगरसेविका, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.