ब्लू फ्लॅग दर्जासाठी नागरिक व पर्यटक एकत्रितपणे पुढे
निलेश भुवड
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
मो. 8149679123
श्रीवर्धन: समुद्रकिनाऱ्याला आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग मानांकन मिळवून देण्यासाठी मास्टेक फाउंडेशन आणि ग्रामीण प्रगती फाउंडेशन यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता आणि जनजागृती मोहिमेला पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग दिला. स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक किनारा निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या उपक्रमाने किनाऱ्यावर सकारात्मक वातावरण निर्माण केले.
सकाळपासूनच स्वयंसेवक, युवक-युवती, महिलांनी समुद्रकिनाऱ्यावर एकत्र जमून प्लास्टिकमुक्ती, कचरा निर्मूलन, समुद्री पर्यावरण संवर्धन या विषयांवर प्रत्यक्ष कृतीचा भाग म्हणून सहभाग नोंदविला. पर्यटकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत स्वच्छतेबाबत जागरूकता वाढविण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला.
या मोहिमेचे आयोजन ग्रामीण प्रगती फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश डफळे आणि सौ. ज्योती डफळे यांनी केले. दोघांनीही श्रीवर्धन समुद्रकिनारा आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अधिक चमकण्यासाठी ब्लू फ्लॅग मानांकनाचे महत्त्व अधोरेखित केले.
किनाऱ्यावर दिवसाभर चाललेल्या उपक्रमांमुळे परिसरात स्वच्छतेची नवी भावना निर्माण झाली असून, “स्वच्छ समुद्र – सुरक्षित पर्यटन” हा संदेश सर्वत्र पोहोचला. श्रीवर्धनच्या प्रगतीसाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी हा उपक्रम एक पाऊल पुढे म्हणून पाहिला जात आहे.









