जलसंपदा व्यवस्थापानामध्ये दापोलीचा देशात दुसरा क्रमांक, 'ॲग्रोवन’ ठरले सर्वोत्तम वृत्तपत्र.

मीडिया वार्ता टीम
९ जानेवारी २०२२: जलसंपदा व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या प्रयत्नांची दखल घेण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने विविध राज्ये, संस्था आणि व्यक्तींना 11 श्रेणींमध्ये एकूण 57 पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात महाराष्ट्राला चार पुरस्कार जाहीर झाले आहेत. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी तिसऱ्या ‘राष्ट्रीय जल पुरस्कार-2020’ची घोषणा केली. या पुरस्कारांमध्ये रत्नागिरी जिल्हयातील दापोली नगर पंचायतीने देशात दुसरा क्रमांक पटकाविला असून महाराष्ट्राला विविध श्रेणीत एकूण चार पुरस्कार जाहीर झाले आहेत.

सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्थेच्या श्रेणीमध्ये रत्नागिरी जिल्हयातील दापोली नगर पंचायतीला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीच्या श्रेणीमध्ये पश्चिम विभागातून निवड करण्यात आलेल्या तीन ग्रामपंचायतींमध्ये सोलापूर जिल्हयाच्या बार्शी तालुक्यातील सुर्डी ग्रामपंचयातीने तिसरा क्रमांक पटकाविला आहे.

जलव्यवस्थापनात उत्कृष्ट कार्यासाठी औरंगाबाद येथील ग्रामविकास संस्थेला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. जनतेमध्ये जलजागृतीकरिता उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशातील एक वृत्तपत्र म्हणून ‘ॲग्रोवन’ वृत्तपत्रास सर्वोत्कृष्ट वृत्तपत्राचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

उत्तर प्रदेश ठरलं देशातले सर्वोत्तम राज्य
जलसंपदा व्यवस्थापन क्षेत्रात उत्तर प्रदेश राज्याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. सर्वोत्तम जिल्हा, ग्रामपंचायत यांची निवड करताना भारताची उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि उत्तर-पूर्व या अश्या विभागात विभागणी करण्यात आली होती. प्रत्येक विभागामध्ये सर्वोत्तम जिल्हा, सर्वोत्तम ग्रामपंचायत यांची निवड करण्यात आली.

जल व्यवस्थापन संबधी सर्वोत्तम मीडिया कार्यक्रम म्हणून नेटवर्क १८ चॅनेलवरील मिशन पाणी या कार्यक्रमाला पुरस्कार देण्यात आला. तसेच देशातील सर्वोत्तम शाळा म्हणून तामिनाडूमधील कावेरीपट्टीनम येथील सरकारी मुलींच्या शाळेला आणि सर्वोत्तम कारखाना म्हणून वेल्स्पून इंडिया टेक्सटाईल लिमिटेड, गुजरात यांना पुरस्कार देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here