जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा!

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो:९९२२५४६२९५

कविवर्य राजा निळकंठ बढे यांच्या जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा या गीतामधील दोन चरणांचे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याच्या निर्णय राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. हे गीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून अंगिकरण्यात येणार आहे.

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत राज्य गीत म्हणून स्वीकारण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून संपूर्ण राज्यातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. महाराष्ट्राला स्वतःचे राज्यगीत असावे ही खूप वर्षापासूनची मागणी होती. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून राज्याला राज्यगीत असावे ही मागणी अनेक दिग्गजांनी केली होती उशिरा का होईना ही मागणी मान्य झाल्याने राजभरात आनंदोत्सव साजरा होत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्याला राज्यगीत मिळाले हा अजब योगायोग म्हणावा लागेल त्यासाठी राज्य सरकारचे आभारच मानावे लागेल.

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत म्हणून जाहीर कारण्यासंबंधीचा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे त्यासोबतच राज्यगीताच्या औचित्य पालनासंदर्भात काही मागदर्शक सूचनाही राज्य सरकारने जारी केल्या आहेत. शासनाच्या सर्व सार्वजनिक कार्यक्रमाच्या सुरवातीला राज्यगीताचे वादन, गायन हे ध्वनिमुद्रित आवृत्ती सोबत अथवा स्वतंत्रपणे करण्यात यावे. १ मे महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीतानंतर राज्यगीत वाजवले अथवा गायले जाईल.

राज्यातील सर्व शाळा महाविद्यालयात दैनिक सत्र सुरू होण्यापूर्वी परिपाठात राज्यगीत वाजवले किंवा गायले जाईल. तसेच सर्व सामाजिक, राजकीय, संसज, क्रिडाविषयक कार्यक्रमाच्या सुरवातीस राज्यगीत वाजवले किंवा गायले जाईल. राज्यगीताला राष्ट्रगीताचा मान देण्यात आला असल्याने राज्यगीत सुरू असताना सर्वांनी सावधान स्थितीत उभे राहून त्याचा सन्मान करावा.

राष्ट्रगीताबाबत जे तारतम्य बाळगले जाते तेच तारतम्य राज्यगीताबाबतही बाळगण्यात यावे अशा मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जारी केल्या आहेत. हे गीत वाजवताना किंवा गाताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही याची काळजी सर्वांना घ्यावी लागणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षात राज्य शालेय मंडळाच्या पाठ्यपुस्तकांमध्येही राज्यगीताचा समावेश होणार आहे.

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा या गीताला राज्य गीताचा दर्जा देण्यासंदर्भात अधिकृत अधिसूचना निघाली असल्याने आता हे अजरामर गीत खऱ्या अर्थाने राज्यभर गर्जनार आहे. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. गेल्या ६३ वर्षात महाराष्ट्राने अनेक क्षेत्रात प्रगती केली. आज महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत राज्य मानले जाते. दिल्लीचेही तख्त राखणारा महाराष्ट्र आज सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. संतांची आणि वीरांची पुण्यभूमी असलेला महाराष्ट्र देशाच्या रक्षणासाठी सर्वात पुढे असतो. जेंव्हा जेंव्हा हिमालय संकटात येतो तेंव्हा तेंव्हा सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून जातो असे वर्णन या गीतामधून केला आहे. त्याच गीताला आज राज्यगीताचा दर्जा मिळाल्याचा अभिमान राज्यातील तमाम जनतेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here