नवी दिल्ली: ‘मुलींना १८ व्या वर्षी लग्नाचा अधिकार दिल्यानं आई-वडिलांची संमती न घेताच पळून जाऊन लग्न करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे आई-वडिलांच्या संमतीशिवाय लग्न करण्याचं मुलींचं वय १८ वरून २१ करण्यात यावं,’ अशी अजब मागणी भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी आज संसदेत केली. त्याबाबतचं खाजगी विधेयकही ते संसदेत सादर करणार आहेत. जागतिक महिला दिनाच्या दिवशीच शेट्टी यांनी ही अजब मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना गोपाळ शेट्टी यांनी ही माहिती दिली. ‘सध्या मुलीचं लग्नाचं वय १८ वर्ष आहे. आई-वडिलांची संमती असेल तर त्यांचा विवाह वयाच्या १८ व्या वर्षी होण्यास विरोध नाही. पण त्यांच्या संमतीशिवाय लग्न करणं योग्य नाही. या वयात मुलींना फारशी समज नसते. केवळ कायद्याचा आधार असल्याने या मुली आई-वडिलांच्या संमतीशिवाय लग्न करतात. प्रसंगी घरातून पळूनही जातात. त्यामुळे त्यांचं लग्नाचं वय १८ ऐवजी २१ करावं. जेणेकरून तीन वर्षात त्या परिपक्व होतील. या तीन वर्षात आई-वडील मुलींचं समुपदेशनही करू शकतात, त्यामुळे आई-वडिलांच्या संमतीशिवाय लग्न करण्याचं मुलींचं वय २१ वर्ष असावं,’ अशी माझी मागणी आहे, असं शेट्टी यांनी सांगितलं. आई-वडिलांच्या संमतीने लग्न करायचं असेल तर मुलींच्या लग्नाचं वय १८ वर्षच असावं, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. ‘१८ व्या वयात मुली सक्षम नसतात असं मला म्हणायचं नाही. पण आई-वडिलांच्या संमतीशिवाय विवाह करण्याचं हे वय नसतं. या वयात त्यांनी एकट्यानं लग्नाचा निर्णय घेणं योग्य नाही. घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्यांची लग्न तुटलेली मी पाहिली आहेत, म्हणूनच मी हे विधेयक आणलं असून आज संसदेत त्यावर बोललोही आहे,’ असं ते म्हणाले. आंतरजातीय विवाह हा एक प्रॉब्लेम असल्याचा सांगत त्यावर अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here