जागतिक महिला दिनानिमित्त महिला बचत गटांना कृषी साहित्य वाटप

जागतिक महिला दिनानिमित्त महिला बचत गटांना कृषी साहित्य वाटप

✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो. 8999904994

गडचिरोली : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गडचिरोली पोलिस दल, समाज कल्याण विभाग व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने “प्रोजेक्ट उडान” अंतर्गत महिला बचत गटांना कृषी अवजारे वाटप करण्यात आले. हा समारंभ पोलीस मुख्यालयातील कवायत मैदान व एकलव्य सभागृह येथे पार पडला.

कार्यक्रमादरम्यान जिल्ह्यातील दुर्गम भागातील 54 महिला बचत गटांना मिनी ट्रॅक्टर, 10 बचत गटांना थ्रेशर मशीन तसेच इतर बचत गटांना स्प्रे पंपांचे वाटप करण्यात आले. यामुळे शेतकरी महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळेल आणि त्यांची शेती अधिक उत्पादक बनेल.

गडचिरोली पोलिस दलाच्या “पोलीस दादालोरा खिडकी” उपक्रमांतर्गत आतापर्यंत 9.39 लाख नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. यामध्ये 16,503 शेतकऱ्यांना कृषी बियाणे वाटप, 5,540 शेतकऱ्यांना शेतीपूरक उपक्रमांसाठी प्रशिक्षण, तसेच 176 शेतकऱ्यांना “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा” योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.
महिला सबलीकरणाच्या दृष्टीने पोलिस दलाच्या पुढाकाराने विविध प्रशिक्षण उपक्रम राबवले जात आहेत. आतापर्यंत 6,020 महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी नर्सिंग, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, ब्युटी पार्लर, फास्टफूड व्यवसाय यांसारख्या कौशल्यविकास प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी महिलांनी शिक्षण आणि स्वावलंबनावर भर द्यावा. महिलांनी स्वतःमधील शक्ती ओळखून अन्यायाविरुद्ध उभे राहिले पाहिजे.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी शासनाच्या विविध योजनांचा शेवटच्या घटकापर्यंत लाभपोहोचावा, यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले. त्यांनी “पोलीस दादालोरा खिडकी” आणि “प्रोजेक्ट उडान” उपक्रमांचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, एम. रमेश, एम. व्ही. सत्यसाई कार्तिक यांच्यासह समाज कल्याण विभाग आणि पोलिस दलाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यकमाच्या यशस्वी आयोजनासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि नागरी कृती शाखेच्या अधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.