अवकाळीचा आंबा बागायतीला तडाखा: मासेमारी नौकाही बंदरात स्थिरावल्या

अवकाळीचा आंबा बागायतीला तडाखा: मासेमारी नौकाही बंदरात स्थिरावल्या

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग;- कडक उन्हाळा सुरू असतानाच दोन दिवसांपूर्वी अचानक हवामान बदल झाल्याने जिल्ह्यासह राज्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या हापूस आंब्याचे मोठे नुकसान झाले असून फळगळती होऊन आंबा काळा पडला आहे. प्राथमिक पाहणीत, जिल्ह्यात आंबा बागायतदारांचे ३० टक्यांपेक्षा अधिक. नुकसान झाल्याचा अंदाज आहे. वादळांच्या तडाख्यामुळे मासेमारी नौकाही बंदरात नांगरून ठेवाव्या लागल्याने मच्छीमारांचेही नुकसान होत आहे.

हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. शुक्रवारी पडलेल्या वादळी पावसाने जिल्ह्यात आंबा बागायतीचे मोठे नुकसान झाले.

जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील तंत्र विस्तार अधिकारी सीमा चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पेण तालुक्यातील १६१ हेक्टरमधील ३१२ शेतकऱ्यांच्या आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. पोलादपूर तालुक्यातील ३.६२ हेक्टरमधील १७ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अंदाज नजर पाहणीत व्यक्त होत आहे. नुकसानग्रस्त तालुक्याचा अहवाल सोमवार सायंकाळपर्यंत आला नसला तरी जवळपास ३० टक्के आंब्याचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शुक्रवारी जिल्ह्यात सर्वच भागात वादळी वाऱ्याने बहुतांश बागायतदारांचे कमी-जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. यातील काही बागायतदारांचे नुकसान अंशतः झाल्याने भरपाई मिळण्यास अडचणी येण्याची शक्यता आहे. यास विमा कंपन्या नुकसानीचा दावा फेटाळण्याची शक्यता असल्याने येथील बागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. शनिवारी दिवसभर कृषी अधिकारी किती नुकसान झाले, याचा अंदाज घेण्यात व्यस्त होते. कर्जत, खालापूर, मुरूड, पेण, सुधागड पाली, महाड या तालुक्यात एकूण आलेल्या पिकाच्या ३० टक्के तयार होत आलेली आंबाफळे गळून पडली आहेत, असे येथील बागायतदारांनी सांगितले. पंधरा दिवसांत ही फळे पिकून तयार झाली असती. गळून पडलेली फळे पिकवता येणार नसल्याने त्याचा काहीही उपयोग बागायतदारांना करता येणार नाही.या पिकावर औषधे, रखवाली, मशागतीसाठी केलेला खर्चदेखील वाया जाणार आहे. त्यामुळे कृषी विभागाने लवकरात लवकर पंचनामे करावेत, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत.

काही दिवस कोकणात अवकाळी पाऊस पाहायला मिळणार आहे. कोकण विभागाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला होता. मासेमारी नौका बंदरात आल्या आहे. पडणाऱ्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी येथील बागायतदारांची चिंता अधिकत वाढली आहे.

रायगड जिल्ह्यात अचानक सुरू झालेला पाऊस काही भागात रात्री उशिरापर्यंत सुरू होता. अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजूच्या बागांना मोठा फटका आहे.बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा व्यापारी चिंतेत आहेत. आधीच नेहमीपेक्षा आंबा कमी प्रमाणात असून, त्यात आता संकट आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

मासेमारी नौका बंदरात हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार खोल समुद्रात केलेल्या मासेमारी नौका शुक्रवारी सकाळी बंदरात परतले होते दोन दिवस वादळी वाऱ्याचा इशारा असल्याने या नौका बंदरातच नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. मागील आठवडाभर वादळी वाऱ्यामुळे समुद्र देखील काही प्रमाणात खवळला आहे. यामुळे मासे मिळणे ही कठीण झाल्याने मच्छीमारांनी नौका बंदरातच नांगरून ठेवणे अधिक सोयीचे मानले आहे.