अक्षय भालेरावच्या हत्येचा वंचित बहुजन युवा आघाडी कडून निषेध,आरोपींची मालमत्ता जमा करण्याची मागणी..
मयुरेश इंगळे
अमरावती प्रतिनिधी
नांदेड पासून 6 की मी वर असलेल्या बोंढार (हवेली) येथे भिमजयंती साजरी केल्याच्या कारणावरून आंबेडकरी युवक तथा वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक शाखा महासचिव अक्षय भालेराव यांची काही गावगुंडांनी हत्या केली सदर हत्येचा वंचित बहुजन युवा आघाडी अमरावती जिल्ह्याचे वतीने निषेध करण्यात आला असून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत गृहमंत्री यांना पाठविण्यात आले आहे..
नांदेड जिल्ह्यातील बोढार या गावी पहिल्यांदा अक्षय भालेराव यांच्या पुढाकारातून भिमजयंती साजरी करण्यात आली होती. जातीयवादी प्रवृत्तीच्या लोकांना ही बाब खटकल्याने त्यांनी अक्षय भालेराव यांचेवर चाकूने वार करत हत्या केली व त्यांची आई व भावाला सुद्धा मारहाण केली.. सदर घटनेमुळे राज्यातील आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाचे वतीने अद्यापही संपूर्ण आरोपिना अटक करण्यात आली नाही. तेव्हा सर्वच आरोपींना अटक करून आरोपींची मालमत्ता जमा करण्याची मागणी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अभिजित देशमुख यांनी केली आहे.
वंचित बहुजन युवा आघाडीने रस्त्यावर उतरून भालेराव यांच्या हत्येचा निषेध केला असून भालेराव यांच्या कुटुंबाला पोलीस सुरक्षा देण्यात यावी व उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अक्षय भालेराव यांच्या कुटुंबातील एकास शासकीय सेवेत सामावून घ्यावे अशा मागण्यांचे निवेदन वंचित बहुजन युवा आघाडीचे वतीने जिल्हाधिकारी मार्फत गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आले.. निवेदन सादर करतेवेळी जिल्हा नेते सिद्धार्थ भोजने, जिल्हा महासचिव सागर भवते, उपाध्यक्ष रीना गजभिये, सहसचिव रुपेश गवई, उज्वल मेश्राम, प्रमोद राऊत, शैलेश बागडे, मयुरेश इंगळे, अमित घोडेस्वार, प्रशांत गजभिये, पलाश रायबोले, सह कार्यकर्ते उपस्थित होते.